उद्घाटनाची घाई? आज मात्र कुलूप... आणि भयाण शांतता...!

By Raigad Times    29-Jun-2022
Total Views |
tala
 
 
तळा । तळा शहरातील रुग्णालयाच्या वास्तूचे उद्घाटन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांची आणि शासकीय यंत्रणेची पक्की धांदल उडाली. विशेष म्हणजे महागाव आणि मांदाड येथील रुग्णालयाची व्यवस्था देखील अपूर्णच आहे. शासनाने या दोन्ही रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. पण या दोन्ही रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने त्याचा फारसा उपयोग रुग्णांना होताना दिसत नाही.
 
तळा येथील रुग्णालयाचे चित्र देखील काही वेगळे नाही. काल २८ जून रोजी या रुग्णालयाच्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या रुग्णालयात कर्मचारी तर नाहीच मात्र रुग्णालयाला लागणारी इतर साधने देखील नाहीत. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅनर लावण्यात आला होता त्या बॅनरवर स्पष्टपणे लिहिले होते ग्रामीण रुग्णालय तळा तालुका तळा उद्घाटन सोहळा. म प्रश्न असा उपस्थित होतो की रुग्णालयात कर्मचारी वर्ग नाही साधन सामुग्री नाही? मग इतकी उद्घाटनाची घाई का बर करण्यात आली? सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती पाहता हा अचानक निर्णय तर नाही ना घेण्यात आला? अशी चर्चा सुरु आहे. आज मात्र रुग्णालयाच्या आवारात पूर्ण पणे भयाण शांतता आहे. संपूर्ण रिकाम्या असलेल्या रुग्णालयाला टाळे देखील लावण्यात आले आहे.
 
रुग्णालयाचे काम देखील अपूर्ण आहे जितके काम पूर्ण झाले आहे त्या सर्व खोल्या देखील रिकाम्या आहेत. सर्व खोल्यांच्या बाहेर पाट्या लावण्या आल्या आहेत मात्र आत मध्ये साधी एक प्लॅस्टिकची खुर्ची देखील नाही. हि सर्व कामे पूर्ण करून रुग्णालय लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी तळमळीची मागणी तळा तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
 
काल घाईगडबडीत करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रम सुरु असतानाच तळा येथील पत्रकारांनी एकत्रित येऊन कार्यक्रमाचे नियोजन बघता काढता पाय घेतला. पत्रकारांनी जेव्हा उद्घाटनाची माहिती शासकीय यंत्रणेला विचारली तेव्हा हा प्रश्न विचारल्यावर नक्की काय उत्तर देयचे असा प्रश्न संबंधित शासकीय यंत्रणेला पडला होता. मग काही वेळाने विचार करून त्यांच्या कडून असे सांगण्यात आले की हे रुग्णालयाचे उद्घाटन नाही तर हे इमारतीचे उद्घाटन आहे. लवकरच रुग्णालय सुरु करून आम्ही नागरिकांना एक उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार आहोत.