कर्जत | कर्जत तालुक्यातील मुरबाड रस्त्यावरील आरवंद गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाची दक्षता आणि गुण नियंत्रक विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील वरई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, शेतकरी कामगार पक्षाचे दीपक धुळे यांनी केली आहे.
कर्जत-मुरबाड या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर पोसरी गावापासून आरवंद-साळोख गावाकडे जाणारा रस्ता खराब झाला होता. गेली अनेक वर्षे या रस्त्याची दुरावस्था झाल्याने स्थानिक या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी करीत होते. शेवटी या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मधून करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर 2022 मध्ये या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले आणि त्यावेळी कामाचा दर्जा बघून रस्ता पुढील पाच वर्षे सुस्थितीत राहील अशी या भागातील ग्रामस्थांना अपेक्षा होती.
मात्र रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने रस्त्याचे खडीकरण तसेच मजबुतीकरण करताना घेतलेला घोळ यामुळे रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे झाले नाही असा स्थानिक ग्रामस्थ दीपक धुळे यांचा आरोप आहे. रस्त्याची कामे सुरू असताना रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू असायची, त्यावेळी ठेकेदार कंपनी कडून कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावले गेले नव्हते, त्याचवेळी पर्यायी मार्गाचा अवलंब व्हावा अशी देखील सूचना करणारे बोर्ड लावले नव्हते. त्यामुळे रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण मजबूत झाले नाही आणि त्यामुळे रस्ता पावसाच्या पहिल्या महिन्यात खराब झाला आहे.
त्याबाबत स्थानिक ग्रामस्थ आणि वरई ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच दीपक धुळे यांनी महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणेने रस्त्याचे डांबरीकरण करताना दुर्लक्ष केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या नादुरुस्त कामाची माहिती शासनाच्या दक्षता आणि गुण नियंत्रक विभाग यांच्याकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी दीपक धुळे हे कोकण भवन येथे जावून दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. मात्र लाखो रुपयांचा निधी खर्च होऊन देखील काही महिन्यात रस्त्यावर खड्डे पडले असल्याने स्थानिकांनी कामाच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.