मुरुड | मुरूड शहराला जोडणाऱ्या एकदरा पुलावर टाकण्यात आलेली उघडी उच्चदाब विद्युतवाहिनी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना हायटेन्शनच टेन्शन ठरत असून महावितरणाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने एकदरा पुलावर पाणी साचून चिखल साम्राज्य निर्माण झाले आहे. या चिखलाच्या बाजूने ही उच्चदाब विद्युत वाहिनी महावितरणने टाकलेली आहे. जर ही विद्युतवाहिनी लिकेज झाली तर बाजूला असलेल्या पाण्यामुळे विद्युत प्रवाह जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच या पुलावरून अनेक वाहने जा-ये करत असतात. जर या ठिकाणी विद्युत वाहिनीचा प्रवाह आणि पाण्याचा संपर्क झाला तर पादचाऱ्यांसह वाहनांनाही वीजेचा धक्का लागून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या एकदरा पुलाची दुरावस्था झालेली आहे. या पुलाची सार्वजनिक बांधकाम खाते देखभाल करायचे परंतु गेले कित्येक वर्ष सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या पुलाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या पुलावर पाणी साचून चिखल होत आहे. या पुलावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळोवेळी जर पुलाची देखभाल केली असती तर या पुलाचे नाव धोकादायक पुलांच्या यादीत गेले नसते. याला सर्वस्वी बांधकाम खाते जबाबदार असल्याचे सर्व स्तरावरुन बोलले जात आहे. तरी बांधकाम खात्याने त्वरित लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी आणि महावितरणने संभाव्य अपघाताचा धोका लक्षात घेऊन येथील उच्चदाब विद्युतवाहिनी हटविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.