पाली-खोपोली राज्य महामार्ग की वाहनतळ?

कंपन्यांच्या ओव्हरलोड गाड्यांची अवैध पार्किंग म्हणजे अपघाताला आमंत्रण

By Raigad Times    04-Aug-2022
Total Views |
pali khopoli
राबगाव/पाली | खोपोली पाली वाकण राज्यमहामार्गावर रासल गावानजीक असणाऱ्या कंपन्यांमध्ये येणाऱ्या मालवाहतूक ट्रक आणि टँकर्ससाठी हा रस्ता म्हणजे अवजड वाहनांचे वाहनतळच बनले आहे. रासल गावच्या हद्दीत पाच ते सहा कंपन्या येतात. या कंपन्यांमध्ये मालवाहतुकीसाठी येणारे ट्रक, टँकर्स हे थांब्यासाठी पाली खोपोली राज्यमहामार्गाचा आधार घेत आहेत. ही वाहने कंपनीच्या बाहेर थांबत असताना रस्त्याच्या दुतर्फा उभी असतात. शिवाय निम्म्या रस्त्यावर ही वाहने कंपनीची जहागीर असल्यासारखी एका पाठोपाठ उभी असतात.
 
कंपनीच्या नियमाप्रमाणे कंपनीत येणाऱ्या माल वाहतूक वाहनांसाठी कंपनीची स्वतंत्र पार्किंग असणे गरजेचे आहे. कंपनी बाहेर महामार्गावर अर्ध्या रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांमुळे महामार्गावरील इतर वाहनांना अपुऱ्या रस्त्यामुळे वाहतुकीस अडचणी येत आहेत. महामार्गावर अवजड वाहनांची लांबच लांब रांग असल्यामुळे एखादे वाहन ट्रक किंवा टँकर कंपनीमधून बाहेर पडताना संपूर्ण रस्ता व्यापते त्यामुळे मागून किंवा समोरून येणाऱ्या वाहनाला धडकून अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
 
पाली खोपोली वाकण राज्य महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण नुकताच झाला असल्याने सध्या वाहनांच्या वेगाला मर्यादा नाही. त्यामुळे अशा कंपन्यांच्या बाहेर महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताला आमंत्रणच म्हणावे लागेल.
 
त्यामुळे कंपन्यांनी स्वतःची पार्किंग व्यवस्था उभी करा अन्यथा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, कंपनी की? ज्या अनधिकृत पार्किंगकडे दुर्लक्ष करणारे वाहतूक पोलीस? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.