मुंबई । गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर शनिवारी मध्यरात्री दोन्ही गटामध्ये जोरदार राडा झाला. वादावादीचं रुपांतर हाणामारीत झाले. दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद काहीसा कमी झाला.
गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटानेदेखील आपला मंच उभारला होता. या मंचावरून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेच्या नेत्यांना डिवचले.
त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली होती. हे दोन्ही गट आमने-सामने भिडल्यामुळे परिसरात काहीसं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. सत्तेचा माज या लोकांना आला आहे. शिवसैनिक म्हणून हे सगळं आम्ही किती सहन करायचं? आमच्या विभाग प्रमुखांना गोळीबारातून टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. सरवणकर यांनी मात्र गोळीबार केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.