ग्रामपंचायत निवडणूक धूमशान.कार्यकर्ते जोमात, नेते कोमात! निष्ठा गेली खड्ड्यात...सीट द्या, नाहीतर चाललो, कार्यकर्त्यांचा तोरा!

20 Oct 2023 14:39:45
alibag
 
अलिबाग । निष्ठा गेली खड्ड्यात...सीट द्या नाहीतर चाललो...कार्यकर्त्यांचा हा तोरा सध्या सर्वच पक्षांच्या नेत्यांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत निवडणूक यावेळी खर्‍या अर्थाने कार्यकर्त्यांनी हातात घेतली आहे. कोणाला थेट सरपंच व्हायचंय तर कोणाला सदस्य. एकंदरीत या निवडणुकीच्यानिमित्ताने कार्यकर्ते जोमात असून नेते अक्षरशः कोमात गेल्याचे चित्र आहे.
 
जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी अनेक पक्षांना उमेदवार तयार करता आलेले नाहीत. राज्यात सत्तेमध्ये असलेल्या आणि विरोधकांच्या नव्या आघाडीतील स्थानिक कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत. कोणाला सरपंचपदाची निवडणूक लढवायची, तर कोणाला सदस्य पदाची.
 
या पक्षातून उमेदवारी नाही मिळत तर दुसर्‍या पक्षातून मिळवण्यासाठी हात पाय मारले जात आहेत. कुठला पक्ष नाही आणि कुठली निष्ठा नाही. नेते वाटेल तेव्हा कोणाशीही युत्या-आघाड्या करु शकतात; तर आम्ही कशाला पक्षाचा विचार करायचा? असा प्रतिप्रश्न विचारत कार्यकर्ते बिनधास्त पक्ष बदलत आहेत. आता नाही तर पुढची पाच वर्षे घरी बसावे लागेल. त्यामुळे ‘साहेब, यावेळी मी लढणारच’ असे सांगून कार्यकर्ते निघून जात आहेत.
 
उमेदवारांच्या घरपटट्या भरण्याचे कामही नेत्यांकडून करवून घेतले जात आहे. उमेदवारी अर्ज भरणे, नंतर मागे घेणे या प्रक्रियेनंतर ग्रामपंचायत निवडणुकीबाबत अधिक स्पष्टता येईल. तोपर्यंत या नेत्यांच्या डोक्याचा भुगा होईल एवढे नक्की. तूर्तास स्थानिक पातळीवर तुम्हीच ठरवा तुमचा उमेदवार, असे सांगताना हे नेते दिसत आहेत.
 
ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक असे म्हटले जाते. असे असले तरी या निवडणुकांमध्ये राजकीय रंग बेमालूमपणे मिसळले जातात. यामुळे गावागावात वादावादी होण्याच्याही घटना घडत असतात. मात्र या निवडणुकीत कार्यकर्तेच नेत्यांच्या हातून निसटत असल्याचे चित्र आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0