रायगड जिल्ह्यात सरपंचपदासाठी 485;सदस्यपदासाठी 3395उमेदवार रिंगणात.

27 Oct 2023 11:10:57
 alibag
 
अलिबाग । ग्रामपंचयात निवडणुका जाहिर झाल्यानंतर अनेकांच्या अंगात निवडणुकीचे वारे शिरले आहे. थेट सरपंचासाठी इच्छुकांचे तर विचारुच नका, दोन हाणा पण सरपंच म्हणा...अशी गत अनेकांची आहे. म्हणुनच कि काय जिल्ह्यातील 210 सरपंच पदासाठी तब्बल 485 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर सदस्यपदासाठी 1 हजार 854 जागांसाठी 3 हजार 395 उमेदवार मैदानात उतरले आहेत.
 
रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होत आहेत. अलिबाग तालुक्यातील 15, मुरूड 15, पेण 11, पनवेल 17, उरण 3, कर्जत 7, खालापूर 22, रोहा 12, सुधागड 13, माणगाव 26, तळा 6, महाड 21, पोलादपूर 22, श्रीवर्धन 8 आणि म्हसळा 12 असा समावेश आहे.
 
210 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी 4 हजार 668 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते. बुधवारी अर्ज मागे घेण्याती प्रक्रिया जिल्ह्यातील तहसील पार पडली. सकाळी साडेदहा वाजल्यापासून वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी केली होती. कोण अर्ज मागे घेणार, कोण रिंगणात राहणार याकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ही उत्कंठा दुपारी तीन वाजेपर्यंत संपली.
 
सरपंचपदाच्या 210 जागांसाठी 825 अर्ज दाखल झाले होते. तर सदस्यपदाच्या 1 हजार 854 जागांसाठी 4 हजार 716 अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर सरपंचपदाचे 814 व सदस्यपदाचे 4 चार 668 अर्ज शिल्लक राहिले होते. बुधवारी अर्ज माघे घेण्याच्या दिवशी सरपंच पदाचे 329 व सदस्यपदाचे एक हजार 273 अर्ज माघार घेण्यात आले.
 
या प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आता सरपंच पदासाठी 485 उमेदवार तर सदस्यपदासाठी 3 हजार 395 उमेदवार मैदाना कायम आहेत.पाच नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी अवघे नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत.
 
मतदान । 5 नोव्हेंबर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत.
मतमोजणी । 6 नोव्हेंबर रोजी तहसीलदार ठिकाण व वेळ निश्चित करतील.
 
Powered By Sangraha 9.0