बल्क ड्रग पार्क दिघीबंदर येथे करण्याच्या हालाचाली

By Raigad Times    22-Nov-2023
Total Views |
 alibag
 
अलिबाग । केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित बल्क ड्रग पार्क प्रकल्प परराज्यात गेल्याच्या मुद्दयावरुन वर्षभरापूर्वी विरोधकांकडून टिकेचे प्रहार सोसावे लागलेल्या राज्यातील महायुती सरकारने या बहुचर्चित प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर ऐाद्योगिक क्षेत्रासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जागेचा पर्याय निश्चित केल्याची माहीत समोर येत आहे.
 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोहा तसेच मुरुड तालुक्यातील 17 गावांमधील एक हजार 994 हेक्टरचे क्षेत्र या प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आले होते. स्थानिकांचा विरोध आणि केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत हा प्रकल्प पुढे बारगळला. स्थानिकांच्या विरोधामुळे जमीन संपादन प्रक्रियेत उभे रहात असलेले अडथळे लक्षात घेऊन महाराष्ट्र ऐाद्योगिक विकासमहामंडळाने यापूर्वीच ऐाद्योगिक विकासासाठी संपादित केलेल्या तीन हजार हेक्टर क्षेत्रावर बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प उभा करण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवर सुरु झाल्या आहेत.
 
दिघी बंदर ऐाद्योगिक क्षेत्रात खासगी विकसकांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा करणे आर्थिकदृष्ट्या किती सुसाध्य ठरेल याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र ऐाद्योगिक विकास महामंडळाने व्यवहार सल्लागाराची (ट्रानजॅक्शन डव्हायझर) नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
या सल्लागारामार्फत या प्रकल्पाचा आर्थिक आणि तांत्रिक सुसाध्यता अहवाल तयार करणे, प्रकल्प प्रस्ताव तसेच खासगी विकसकाच्या सहभागासाठी अटी, शर्ती तयार केल्या जाणार आहेत. महाराष्ट्र ऐाद्योगिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सुत्रांनी दिली.
 
वाढीव जागेचे संपादन होणार ?
दिघी बंदर ऐाद्योगिक क्षेत्रासाठी श्रीवर्धन, रोहा तालुक्यातील 4016 हेक्टर इतके क्षेत्र अधिसूचित करण्यात आले आहे. यापैकी 2850 हेक्टर इतके क्षेत्र एमआयडीसीने मोबदला अदा करुन यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. या व्यतिरिक्त आणखी 1166 हेक्टर इतके क्षेत्र संपादित करण्याची कार्यवाही सुरु असून या भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यापूर्वीच काही कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे या संपादित औद्योगिक पट्ट्यातच हे पार्क विकसित करण्यात येणार आहे.