रायगडमध्ये शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभेच्या जागेवर सांगितला दावा; राष्ट्रवादीलाही निर्वाणीचा इशारा

By Raigad Times    22-Nov-2023
Total Views |
 alibag
 
अलिबाग । रायगड जिल्हयात शिवसेनेने (शिंदे गट) भाजप आणि राष्ट्रवादीविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. राज्यात सत्तेत असलेले हे दोन्ही मित्रपक्ष स्थानिक पातळीवर शिवसेनेला अडचणीत आणत असून वेळीच सुधारणा झाली नाही तर लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिला आहे. रायगड लोकसभेच्या जागेवर दावादेखील त्यांनी केला आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणार्‍या शिवसेना उमेदवारांचा सत्कार मंगळवारी (21 नोव्हेंबर) रोजी अलिबाग येथे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. रायगड मतदार संघावर आमचाच हक्क आहे. ही मागणी मान्य झाली नाही तर सर्व पदाधिकारी राजीनामा देतील असा इशारा केणी यांनी दिला.
 
ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपने असहकार भूमिका घेतल्याने शिंदे गटाला अलिबाग विधानसभा मतदारसंघात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सरपंच, सदस्य पडण्याला भाजपची एककल्ली भुमिका कारणीभुत ठरल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दिलीप भोईर यांचे नाव न घेता टिका करतानाच, रायगडात भाजप ही शेकापची बी टीम म्हणून काम करीत असल्याचा आरोप राजा केणी यांनी केला आहे.
 
alibag
 
राजा केणी यांनी मांडलेल्या भूमिकेला आमदार महेंद्र दळवी यांनीही पाठींबा दिला आहे. त्यांनीही मित्रपक्षांना धारेवर धरले. आगामी काळात मित्रपक्षांमध्ये सुधारणा झाली नाही तर तुमचा हिशोब करू, असा इशारा दळवी यांनी भाजपसह राष्ट्रवादीलाही दिला आहे. भाजपमध्ये नव्याने आलेले काही जण ताकद अजमावून पहात आहेत परंतु ते तोंडघशी पडल्याची टीका दळवी यांनी केली.
 
भाजपने उमेदवार उभे केले नसते तर इंडिया आघाडीचा सुफडा साफ झाला असता. कुणी कितीही सांगितले तरी त्याही परिस्थितीत शिवसेना अजूनही सरस आहे असा दावा त्यांनी केला आहे. खानावची एक ग्रामपंचायतीचा निकाल वेगळा लागला असला तरी, पेंढाबे आणि रेवदंडा आम्ही घेतल्या आहेत.
 
आम्ही प्रामाणिकपणे काम करतो मात्र ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच आपला घात करतात. पुढील निवडणूका आपण वेगळी रणनिती आखून लढवू, तुम्ही नव्या जोमाने कामाला लागा असे आवाहन आ. दळवी यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
यावेळी रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे यांनीही ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेबददल नाराजी व्यक्त केली. यावेळी अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, खजिनदार सुरेश म्हात्रे, भरत बेलोसे, महिला आघाडीच्या मानसी दळवी आदिंसह प्रमुख पदाधिकारी, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मोठया संख्येने उपसथित होते.