पाली/बेणसे । शनिवार ते सोमवार अशा सलग आलेल्या सुट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी झाली होती. शिवाय पालीतून इतर पर्यटक देखील दक्षिण रायगड व कोकणाकडे व पुणे मुंबईकडे जात आहेत. परिणामी पर्यटक व भाविकांच्या गाड्यांमुळे रविवारी (ता.26) व शनिवारी (ता.25) पालीत वाहतुक कोंडी झाली.
पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कोंड सोडवणे अवघड होत आहे. सरकारे सातत्याने बदलत आहेत, मात्र येथील समस्या जैसे थे राहत असल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे.पालीतील वकील स्वराज मोरे यांनी सांगितले की वारंवार होणार्या वाहतूक कोंडीवर नगरपंचायत प्रशासन व पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्यात यावी.
नगरपंचायत मार्फत काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आले, देवस्थानच्या जागा अवैधरित्या घेऊन रस्ता रुंदीकरण करण्यात आले. मात्र त्याने काहीही फायदा झालेला दिसत नाही. शिवाय रस्ते खराब असल्याने धुरळ्याचा प्रचंड त्रास होत असून नागरिक आजारी पडत आहेत असे देखील ऍड. स्वराज मोरे यांनी सांगितले.
यामुळे वाहतूक कोंडीसलग सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व बसेस पालीत दाखल होत आहे. शिवाय येथील अरुंद रस्ते, नो एैंन्ट्रिमधुन जाणारी वाहने, मोठ्या व अवजड वाहनांची रेलचेल, वाहतुकिचे नियम मोडणारे वाहनचालक आदी कारणांमुळे पालीत वारंवार वाहतूक कोंडी होते. अरुंद रस्त्यांमुळे दोन्ही बाजुने आलेल्या वाहनांना जाण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी वाहने अडकून पडून वाहतूक कोंडी होते.