रायगड / महाड | एमआयडीसी येथे मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्फोटात 4 जण मृत झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर महाड ग्रामीण रुग्णालयात 3 जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली.
रायगड-महाड येथील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीमध्ये स्फोट झाला. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे आजुबाजूचा परिसर हादरला. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली. यामुळे कामगारांना त्रास झाला आहे. एका कामगाराला गॅसची लागण तर काही कामगार अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 11 कामगार अद्याप बेपत्ता असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बाणापुरे यांनी दिली. बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. आग नियंत्रणात असली तरी जिल्ह्यातील अनेक अग्निशमन यंत्रणा, पाण्याचे टँकर घटनास्थळी उपस्थित आहेत.
स्फोटानंतर प्लांट मध्ये लागली आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर अग्नीशमन यंत्रणा, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन वाहनांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.