अलिबाग । अलिबाग तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप-शिवसेना (ठाकरे गट) इंडिया आघाडीतील घटकपक्षांच्या बाजूने कौल दिला आहे. तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींपैकी 8 जागा या आघाडीला मिळाल्या आहेत. शिंदे गट 3, कॉगे्रस 2, अपक्ष एक आणि खानाव परिवर्तन पॅनल 1 असा समिश्र निकाल लागला आहे. शेकापने दोन ग्रामपंचायती एकहाती मिळवल्या आहेत.
अलिबाग तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.5) मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सोमवारी (दि.6) मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीनंतर ठिकठिकाणी विजयी उमेदवारांनी रॅली काढत विजयोस्तव साजरा केला. पहिल्यांदाच पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरलेल्या भाजपने एकही ग्रामपंचायात जिंकली नसली तरी 22 सदस्य निवडून आणले आहे.
खानावमध्ये परिवर्तन...
खानाव ग्रामपंचायतमध्ये अनंत गोंधळी यांचे वर्चस्व होते. खानाव ग्राम पंचायत अनंत गोंधळी आपल्याकडेच राखतील असे बोलले जात असतानाच, येथे काँग्रेस, शेकाप, शिवसेना ठाकरे गट यांच्या इंडिया आघाडीने एकत्र येत परिवर्तन पॅनलमधून गोंधळी यांना पराभूत केले. खानाव मधील पराभव शिंदे गटाच्या जिव्हारी चांगलाच लागला आहे.
रेवदंडामध्ये सत्तापालट रेवदंडा ग्रामपंचायत असणार्या रेवदंडा मधील शेकापची सत्ता उलथून टाकण्यास शिंदे गटाला यश आले आहे. प्रफुल्ल मोरे बहुमताच्या जोरावर सरपंचपदी विराजमान झाले आहेत.
किहीममध्ये पिंट्याचा करिष्मा....
किहीममध्ये शेकाप काँग्रेस आघाडी आणि भाजप यांच्या लढाई होती. मात्र येथे अपक्ष उमेदवार समाजसेवक प्रसाद तथा पिंट्या गायकवाड यांनी बाजी मारली. त्यांना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाठिंबा दिला होता.
खिडकीमध्ये काँग्रेस आणि शेकाप यांच्यातील लढतीमध्ये काँग्रेसचा विजय झाला. तर वाडगाव मधील राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेल्या जयेंद्र भगत आणि ऋषिकांत भगत या दोन सख्या भावांमध्ये झालेल्या लढतीत धाकटा जयेंद्र भगत यांनी एकतर्फी विजय मिळवला.
आ महेंद्र दळवी यांनी प्रतिष्ठेच्या बनवलेल्या खंडाळा ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप उमेदवार नासिकेत कावजी यांनी विजय मिळवला नागावमध्ये हर्षदा मयेकर विक्रमी मतांनी विजयी तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. थेट सरपंचपदाच्या उमेदवार हर्षदा मयेकर याच विजयी होतील अशी अपेक्षा होतीच, मात्र त्यांनी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 1 हजार 991 मतांच्या आघाडीने संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान पटकावला.
आवासमध्ये अभिजीत राणेनी घेतली एकहाती सत्ता आवास ग्रामपंचायतमध्ये अभिजीत राणे यांनी पुन्हा एकदा एकहाती ग्रामपंचायत स्वतःकडे राखली आहे. येथे घुसण्याचे विरोधकांचे प्रयत्न पुन्हा एकदा असफल झाले आहेत.