रोहा । 5 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या 12 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येताच राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची व तालुक्यातील बहुचर्चित खारगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रेय चिमाजी काळे थेट सरपंच निवडून आले.
खारगाव गु्रप ग्रामपंचायत म्हणजे खारी-काजुवाडी गुरूनगर, गौळवाडी तारेघर ही महत्वाची गावे आदिवासी वाड्या वस्त्या या प्रामुख्याने रोहा माणगाव-श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये येतात. तर खारगाव हद्दीतील गावे आदिवासी वाड्या-वस्त्या या मुरुड-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये विभागल्या गेल्या आहेत.
येथे राष्ट्रवादी, शेकाप आणि शिंदे गटामध्ये तिरंगी लढत पहायला मिळाली. राष्ट्रवादीने अगोदरच 5 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आणले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला होता. त्याचीच परिणीती म्हणून थेट सरपंच पदाचे उमेदवार दत्तात्रेय चिमाजी काळे हे सर्वाधिक 990 मतांचे मताधिक्य घेत निवडून आले.
निवडणूक पूर्व बिनविरोध निवडून आलेले सदस्य प्रभाग क्रमांक 4 रोहिणी रोहिदास शिर्के, रामदास रामचंद्र दळवी, राजेंद्री बबन वारगुडे, आणि प्रभाग क्र.1 चे नयना नवनीत सावंत, चिमा आत्माराम ढुमणे तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार प्रभाग क्रमांक 3 सदस्य सतेज चंद्रकांत आपणकर, विमल मंगेश जगताप, शिवसेना शिंदे गटाने खारगाव प्रभाग क्रमांक 1 विकास रामचंद्र पाटील आणि प्रभाग क्रमांक 2 मोहन आत्माराम धासडे हे दोन सदस्य पहिल्याच वेळेत दमदार इंट्री करत विजय झाल्याने आ.महेंद्र दळवी यांचा करिश्मा चालला असून पहिल्यांदाच खाता खोलल्याने पक्ष श्रेष्ठींनी समाधान व्यक्त केले आहे.
तर खारगाववर शेकापचे वर्चस्व असतानादेखील प्रभाग क्रमांक 2 शिल्पा पाटील रूपाने एका सदस्यावर समाधान मानावे लागले तर प्रभाग क्रमांक 3 अपक्ष म्हणून तारेघर म्हणून बायजा मातेरे यांनी एकेरी लढत देत विजय संपादन केला.