दोन मुलींसह आईने केली रेल्वे खाली आत्महत्या नवरा लक्ष देत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

01 Dec 2023 18:00:53
mangoan
 
माणगाव (भारत गोरेगावकर) - मुलींचे शिक्षण आणि दैनंदिन जीवन जगताना झालेले कर्ज त्यातच नवरा लक्ष देत नाही कि कसलीही मदत करत नाही यामुळे जगणे असह्य झाल्याने आपल्या दोन मुलींना सोबत घेऊन एका आईने स्वतःही कोकण रेल्वे खाली आत्महत्या केल्याची ह्रदय द्रावक घटना माणगाव तालुक्‍यातील गोरेगाव येथे घडली या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे.
 
गोरेगाव येथील गावडे काॅम्पलेक्स या वसाहतीत राहणाऱ्या रिना जयमोहन नायर या महिलेने आपली चौदा वर्षांची मुलगी जिया आणि अकरा वर्षांची मुलगी लक्ष्मी या दोन चिमुकल्यांना सोबत घेऊन कोकण रेल्वेच्या कोकण कन्या एक्स्प्रेस या गाडी खाली पहाटे तीन वाजता आत्महत्या केली मोटारमन यांनी या अपघाताची माहिती माणगाव रेल्वे स्थानकात दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला गोरेगाव पोलिसांनी तातडीने रेल्वे ट्रॅक गाठले मात्र दोनच मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू झाला पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कापडेकर, सोपान रासकर, हवालदार यशवंत चव्हाण, दिलीप बेंडूगडे, धोंडिबा गिते यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी कसून शोध घेतला असता दुपारी जिया हिचा मृतदेह ट्रॅक नजीक च्या झुडपात आढळून आला.
 
व्हाईस मेसेज मुळे झाला उलगडा....
गोरेगाव रेल्वे स्थानका पासून काही अंतरावर दोन महिलांना अपघात झाला इतकाच मेसेज पोलीस यंत्रणेला मिळाला होता मात्र या अपघाताची चर्चा होताच पहाटे दुर्दैवी रिना यांची मैत्रीण स्वतःहून गोरेगाव पोलीस ठाण्यात आली व तीने आपल्याला मैत्रीणीने व्हाईस मेसेज पाठवला होता अशी माहीती दिली रिना यांनी पाठवलेल्या व्हाईस मेसेज मध्ये... वहिनी मला माफ करा मी तुम्हाला बोलले परंतू माझ्याकडून नाही होत मी माझ्या दोन्ही मुलींना घेऊन जातेय जीव द्यायला मोहन मुळे.
 
त्याला इकडे बोलवून माझे जे देणे आहे ते द्यायला सांगा आणि रूम सोडून जायला सांगा.. रिना यांचा हा शेवटचा आवाज जड अंतःकरणाने त्यांनी हा आपल्या आवाजातील मेसेज जवळच्या मैत्रीणीला रात्री मरणापूर्वी पाठवला होता यानंतर या धक्कादायक प्रकाराचा उलगडा झाला आणि दोन मृतदेहांची ओळख पटली ती रिना आणि लक्ष्मीची यानंतर शोध सुरू झाला तो जिया चा... रेल्वे ट्रॅक वरती कुठेही काही सापडत नव्हते त्यामुळे संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला.. जिया जर जिवंत असेल तर ती एकमेव घटनाक्रमाची साक्षीदार होती त्यामुळे पोलीस, पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ सर्वत्र शोध घेत होते मात्र हा शोध अखेर दुपारी थांबला कारण जिया हिचा मृतदेह अपघातस्थळाच्या शेजारी झुडपात सापडला.
 
असा झाला शेवटचा प्रवास...
गुरूवारी रिना आणि त्यांच्या दोन्ही मुलींचा दिवस नेहमी प्रमाणेच गेला जिया हि इयत्ता नववीत तर लक्ष्मी इयत्ता सातवीत लोणेरे येथील एस एस निकम शाळेत शिकत होत्या गुरुवारी नेहमी प्रमाणे त्या शाळेत गेल्या होत्या दिवसभर शाळा आणि क्लासेस उरकल्या नंतर घरी रात्रीचे जेवण सुध्दा झाले मध्यरात्रीनंतर अडीच वाजता गोरेगाव येथून तिघींचा स्कूटी वरती प्रवास सुरू झाला दिड किलोमीटर इतक्या अंतरावर रेल्वे ब्रिज जवळ स्कूटी उभी राहिली आणि तीन वाजता तीन जीवांचा प्रवास कायमचा थांबला...
 
काय होते जीवन...
रिना या मुळच्या गोरेगाव मधल्या त्यांनी केरळ येथील जयमोहन नायर याच्या सोबत प्रेम विवाह केला होता त्यांना दोन मुली झाल्या पण जयमोहन सोबत राहत नव्हता रिना दोन्ही मुलींना घेऊन भाडोत्री घरात राहत होत्या त्या स्वतः सर्व खर्च चालवत होत्या त्यांनी जी यादी केली आहे त्यानुसार मुलींच्या शाळेची, बसची, क्लासेस ची फी भरायची होती तसेच दुधाचे पेमेंट, रूम भाडे थकले होते दैनंदिन खर्चासाठी पैसे हात उसने घेतले होते ते परत करायचे होते शिवाय खाजगी फायनान्स वरती घेतलेल्या मोबाईल चे हप्ते थकले होते यासाठी जयमोहन कोणतीच मदत करत नव्हता म्हणूनच हे टोकाचे पाऊल उचलून तीन जिवांना या जगाचा निरोप घ्यावा लागला.
Powered By Sangraha 9.0