माणगावः महिलेचा सर्प दंशाने मृत्यू

05 Dec 2023 16:19:51
mangaon
 
माणगाव । माणगाव तालुक्यातील मांजरवणे गावातील महिलेचा सर्प दंशाने मृत्यू झाल्याची घटना रविवार घडली. महिलेचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून तशी तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
 
मांजरवणे गावातील विवाहिता दनिया हाशिम हर्णेकर (वय -24) या महिलेला सोमवार दि. 4 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता विषारी सर्पाने पायाला दंश केला. यानंतर तिला लगेचच तिच्या घरच्या मंडळींनी सकाळी 8: 30 वाजता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिच्यावर औषधोपचार सुरू असताना दुपारी 3 वाजून 12 मिनिटांनी तेथील डॉक्टरांनी ती महिला मयत झाल्याचे घोषित केले.
 
दरम्यान, मयत महिलेचा दिर महेफुज हर्णेकर याने सांगितले की, आमच्या वहिनीचा मृत्यू झाला आहे. सकाळी 8:30 वहिनीला येथे आणल्यावर कोणीच डॉक्टर नव्हते. डॉक्टरांनी उशिरा दुपारी एम. जी. एम. हॉस्पिटलला घेऊन जा असे सांगितले तोपर्यंत वहिनीचा मृत्यू झाला होता.
 
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय माणगाव यांनी सांगितले की, रुग्ण महिला दानिया हाशिम हर्णेकर यांना सर्प दंश झाल्याने सकाळी 9:15 वाजता रुग्णालयात दाखल झाल्यावर लगेचच औषधोपचार सुरू केले. आवश्यक ती सर्व औषधे वापरण्यात आली परंतु तिच्याकडून तसा प्रतिसाद मिळाला नाही.
Powered By Sangraha 9.0