पेणमध्ये पोलिसाकडून महिला पोलिसाचा विनयभंग; गुन्हा दाखल

By Raigad Times    26-Apr-2023
Total Views |
pen policeman harrased policewomen  
पेण । गेली 17 वर्ष पेण उप विभागीय कार्यालयातकार्यरत असणारे पोलीस हवालदार राजू उर्फ राजीव परशुराम पाटील याने त्याच कार्यालयात असणार्‍या महिला पोलीस हवालदाराचा दोन वर्षे विनयभंग केल्याची तक्रार पेण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे.
 
पेण उप विभागीय कार्यालयात कार्यरत असणारा पोलीस हवालदार राजू पाटील उर्फ राजीव परशुराम पाटील, रा.मळेघर (वाशी नाका) याने सदर महिलेस सतत आय लव्ह यु बोलून तू मला हो बोल, मी तुझा एटीएम होण्यास तयार आहे असे बोलून, लज्जा उत्पन्न केली. तसेच सदर महिला पोलीस कर्मचारी घरी परत जाताना नेहमीच पाठलाग करत गेली 2 वर्ष सदर महिला हवालदाराच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत आहे.
 
सततच्या कृत्याला कंटाळून फिर्यादी महिला पोलिसाने वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने पेण पोलीस स्टेशन मध्ये कलम 354, 354(अ)1, 4, 354(ड)1, 509 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सदर घटनेचा तपास रोहा उप विभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे ह्या करीत आहेत. पोलीस हवालदार राजीव उर्फ राजू पाटील हा गेली 17 वर्ष कायम एकाच जागी पेण उप विभागीय कार्यालयात कार्यरत असल्याने कायम दादागिरी करत असल्याने सदर पोलीस हवालदार राजू पाटीलला तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करावी असे फिर्यादी व पेण मधील महिलांनी मागणी केली आहे.