आमचं ठरलंय! मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी दिली प्रेमाची कबुली

By Raigad Times    16-Jun-2023
Total Views |
mugdha 
 
अलिबाग । ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी संगीत क्षेत्रात त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पंधरा वर्षांपूर्वी झालेली त्या दोघांची मैत्री आजही कायम आहे. आता त्यांनी या मैत्रीला पुढे नेण्याचा निर्णय घेत प्रेमाची कबुली दिली आहे.
 
‘सा रे ग म प’नंतरही प्रथमेश आणि मुग्धा यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम एकत्र केले आहेत आणि अजूनही करत आहेत. त्या व्यतिरिक्त अनेकदा ते दोघं एकत्र दिसतात. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत असा अंदाज त्यांचा चाहत्यांना होता. तर चाहत्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे. प्रथमेश आणि मुग्धा यांनी सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर करत त्यांचं नातं जाहीर केलं आहे.
 
त्या दोघांनी त्यांचा एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत लिहिलं, तुम्ही सर्व ज्या बातमीची वाट बघत होतात ती अखेर आम्ही सांगत आहोत. आमचं ठरलंय! याचबरोबर त्यांनी या पोस्टला एम गॉट मोदक, मोदक गॉट मॉनिटर, फॉरएव्हर, कपल्स गोल्स हे हॅशटॅगही वापरले. त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच तुफान व्हायरल झाली.
 
त्या दोघांनी नात्याची कबुली देणं हा अनेकांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. आता सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांबरोबरच कलाक्षेत्रातील मान्यवरांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-----------------------
स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक
 
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी नुकतेच एक पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. यावर स्पृहा जोशीने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. प्रथमेश आणि मुग्धाच्या या पोस्टवर कमेंट करत तिने लिहिलं, वा बुवा!वेलकम वहिनी. तर त्यावर गायक अवधूत गुप्ते रिप्लाय देत म्हणाला , वेलकम! जीजू का नाही? त्यावर स्पृहा म्हणाली, अहो सर, ते आधीच सासरे आहेत माझे. त्यावर प्रथमेश लघाटेची होणारी पत्नी मुग्धा वैशंपायनने लिहिलं, हो. म्हणजे मला जेव्हा हे कळलं तेव्हा माझंही असंच झालं, की मी सासू!!!! नाहीीीी त्यावर प्रथमेशने रिप्लाय देत लिहिलं, सासरा आहे मी तिचा.