रोह्यात अंमली पदार्थ विकणार्‍याला अटक

17 Jun 2023 11:27:00
 roha drugs mafiya
 
रोहा । रोहा शहरात चरस, गांजा व इतर अंमली पदार्थ विक्री व व्यसन करणार्‍यांची संख्या दिवसांगणिक प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. गावातील तरुण पिढी व्यसनच्या आहारी गेल्याने अनेकांचे आयुष्य उदवस्थ झाले आहेत. हे भयाण वास्तव समोर असताना काही महिन्यापूर्वी पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणार्‍यांना कायद्याचा बडगा दाखवला होता.
 
मात्र काही दिवसानंतर परिस्थिती ’जैसे थे’ असल्याने आज पुन्हा एकदा पोलिसांनी या गांजा माफियांविरोधात मोहीम हाती घेऊन एका गांजा विकणार्‍या तरुणाला रंगेहाथ पकडले आहे.अहमद सत्तार बडे (रा. रोहा खालचा मोहल्ला) असे कारवाई केलेल्या आरोपी व्यक्तीचे नाव असून काही महिन्यापूर्वी गांजा विक्रीसाठी नेत असताना त्याला पोलिसांनी मुद्देमाल सहित अटक केली होती.
 
कारवाई नंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर अहमद बडे पुन्हा एकदा अंमली पदार्थाची तस्करी व विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना समजली. दि. 15 जून रोजी गुन्हे अन्वेष्ण विभाग आणि रोहा पोलीस यांनी संयुक्तरित्या केल्या कारवाईत अहमद बडे कडून 378 ग्रॅम वजनाचा 8750 रुपये किंमतीचा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, उप निरीक्षक धनाजी साठे, पो. ह. खैरनार, पो. ह. चव्हाण, पो. ना. जाधव, पो. शि. सावंत यांनी मोलाची कामगिरी बजावली.
 
 
Powered By Sangraha 9.0