अलिबाग | केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक उषा पोळ व संचालक यश पाल यांनी केंद्रीय ग्रामविकास अंतर्गत रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार्या विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी रायगड जिल्ह्यात ग्रामविकास अंतर्गत उत्तम काम करण्यात आले असून, या पुढील कालावधीतही असेच काम करावे, असे गौरवोद्गार यश पाल यांनी काढले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात केंद्रीय ग्रामविकास अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सुरुवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी रायगड जिल्ह्याची भौगोलिक माहिती तसेच जिल्ह्यात ग्रामीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणार्या योजनांची सविस्तर माहिती दिली.
यानंतर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अतिरिक्त महासंचालक उषा पोळ व संचालक यश पाल यांनी योजनानिहाय कामांचा आढावा घेतला. यामध्ये घरकुल योजना, रोजगार हमी योजना, वृक्षलागवड, स्वच्छ भारत मिशन, जळजीवन मिशन, बचत गट यांसह विविध योजनांचा आढावा घेतला.
यावेळी यश पाल यांनी जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.