पेण | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर व त्याच्या अन्य सहकाऱ्यांना पेणच्या सेतू कार्यालय चालक, मुद्रांक विक्रेत्याकडून रोख दीड लाख रुपये घेताना पेण पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. तक्रारी नंतरही कार्यालय सुरु ठेवण्यासाठी 10 लाख रुपयेची खंडणी मागितली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांनी सापळा रचत आरोपी संदीप ठाकूर व त्याच्या अन्य सहकाऱ्यांना रंगेहात पकडले. सविस्तर घटना अशी की, काही दिवसांपासून पेण येथील सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी तालुक्यातील पालक-विद्यार्थ्यांची गर्दी होत असे.
हीच संधी साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी मनसे पक्षातील अन्य सहकाऱ्यांसहित सेतू कार्यालयाला समोर स्टंटबाजी केली होती. यावेळी दबाव येण्यासाठी पेण तहसील कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलनही केले होते. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मुद्रांक विक्रेत्यांकडे वळवला होता. यावेळी फिर्यादी तथा मुद्रांक विक्रेता, माजी नगरसेवक हबीब खोत यांच्यावर दबाव येण्यासाठी पेण तहसील कार्यालय परिसरात हंगामा केला होता. त्यानंतर आरोपी संदीप ठाकूर याने मुद्रांक विक्रेते, फिर्यादी हबीब खोत यास फोन करायला सांगून 1 जुलै रोजी राजू पोटे मार्गावरील नारायण निवास येथील कार्यालयात भेटण्यासाठी बोलविले.
फिर्यादी हबीब खोत हे वरिष्ठांशी चर्चा करून पेण शहरातील कार्यालयात गेले असता आरोपी संदीप ठाकूर, रफिक तडवी व शालोम पेणकर यांनी मुद्रांक विक्रीच्या व्यवसायाविरुद्ध यापुढे तक्रार न करण्यासाठी फिल्मी स्टाईलने फिर्यादी याची अंगझडती घेऊन मोबाईल ताब्यात घेऊन कार्यालयाच्या दरवाजाची कडी लावून चाकूचा धाक दाखवून पहिले 10 लाख व तडजोडीअंती 3 लाख रुपये रोख व दरमहा 40 हजार रुपये खंडणी मागितली होते. खंडणी न दिल्यास राजकीय जोर लावून तुझा परवाना रद्द करण्याची व चाकूचा धाक दाखवून जीवाची बरेवाईट करण्याची धमकी दिली.
शेवटी तडजोडीअंती 2 लाख रुपये रोख देण्याचा तोडगा निघाला. यानंतर 7 जुलै रोजी रात्रौ 8 च्या सुमारास आरोपी संदीप ठाकूर आपल्या अन्य साथीदारासह पेण शहरातील मुख्य नाक्यावरील सुपर मार्केट समोर पहिला हप्ता 50 हजार रुपये स्वीकारला. त्यानंतर मनसेचा उपजिल्हाध्यक्ष आरोपी संदीप ठाकूर यांनी उर्वरित दीड लाख रुपयांची मागणी मंगळवार 11 जुलै रोजी केली असता फिर्यादी हबीब खोत यांनी पेणचे नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या कडे तक्रार केली.
यावेळी, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीवायएसपी शिवाजी फडतरे हे स्वतः पोलिसांना सोबत घेऊन दुपार पासूनच सापळा रचून सायंकाळी 7.15 च्या सुमारास उर्वरित दीड लाख रुपये रोख घेताना संदीप ठाकूर व अन्य सहकाऱ्यांना रंगेहात पकडले. पेण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 209/2023 ची नोंद करण्यात आली असून भादवी कलम 386, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.