कुणाशी युती नको, भानगडीही नको ; कोकणात राज ठाकरेंकडुन स्वबळाचा नारा

By Raigad Times    14-Jul-2023
Total Views |
raj thakre
 
रत्नागिरी | मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. पण आता आपल्याला कुणालाही बरोबर घ्यायचं नाही. आपल्याला कुणाशी युती नको, ना कुणाच्या भानगडी नको असे सांगत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्याना स्वबळाचा नारा दिला. नगरपरिषदेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (१३ जुलै) कोकण दौर्‍यावर आहेत. दापोली, चिपळून आणि खेड येथील मनसे कार्यकर्त्याशी राज ठाकरेंनी पक्षबांधणी संदर्भात संवाद साधला.
 
यावेळी राजठाकरे यांनी खेडमध्ये भाषण करताना स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच खेडमधील जनता मनसेच्या उमेदवारांना नक्की साथ देतील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी बोलून दाखवला. राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, माझ्यासमोर तुम्ही सर्वजण बसला आहात. मला तुमची साथ हवी आहे, अशी माझी अपेक्षा आहे. ऐन मोक्याच्या वेळी मला तुमची साथ हवी आहे. मला फे एवढंच सांगायचंय की, मागच्या वेळी ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या. पण, आता नगरपरिषदेच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत. आपल्याला कुणालाही बरोबर घ्यायचं नाही.
 
आपल्याला कुणाशी युती नको, ना कुणाच्या भानगडी नको. मला खात्री आहे की, आपण मनसे म्हणून खेडमध्ये जेव्हा निवडणुका लढवू, तेव्हा खेडमधील जनता आपल्याला निश्चित यश देईल. आज मी मोठं भाषण द्यायला आलो नाही. आपलं दर्शन झालं हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. खेडमधील मतदारांना उद्देशून राज ठाकरे पुढे म्हणाले, अनेक वर्षापासून तुम्ही मतदानाला जाता, रांगेत उभं राहता. अनेक आमदार-खासदार निवडून देता.
 
अनेकदा तेच तेच लोक पुन्हा निवडून देता. पण यावेळी मतदान करताना आपल्या मनाला एक प्रश्न विचारा, १७ वर्षे झाली तरी आपल्या कोकणातला रस्ता का होत नाही? समृद्धी महामार्ग जर साडेचार वर्षात पूर्ण होत असेल तर आपल्या कोकणातला रस्ता १७ वर्षे झालं तरी पूर्ण का होत नाही. कोकणात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे आहेत. आपण हे सगळं निपूटपणे भोगतो. एवढ्या सगळ्या गोष्टी भोगल्यानंतर, आपण पुन्हा त्यांनाच मतदान करण्यासाठी रांगेत उभं राहतो. याचं मला आश्चर्य वाटतं. या बारीक-बारीक गोष्टी निवडणुकीच्या वेळी लक्षात ठेवा. एवढंच मला यावेळी सांगायचं आहे, अशी साद राज ठाकरेंनी मतदारांना घातली.