रसायनी | गेले तिन दिवस रायगडात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यातच रासायनी पोलीस स्टेशनही पाण्याखाली गेल्याची माहिती पोलीस अधिक्षक श्री. घार्गे यांनी दिली आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचले असले तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मागील ४८ तास जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रासायनीसह, आपटा भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
रसायनी पोलीस स्टेशनमध्येही पाणी साचले. पोलीस स्टेशन, ठाणे अंमलदार कक्ष, आरोपी कोठडी, पोलीस निरीक्षक कक्ष यासह संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचले. यानंतर कर्मचार्यांनी महत्वाचं साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. दरम्यान, कर्जत खालापूर परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. आपटा, रसायनी परिसरात नदीचं पाणी सखल भागात शिरण्यास सुरुवात झाल्याने आपटा परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.