- जास्तीत जास्त वकीलांनी सेवेचा लाभ घ्यावा
- प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांचे आवाहन
अलिबाग । अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात वकीलांसाठी ई-फायलिंग व फॅसिलिटी सेंटर सुरु करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील हे पहिले ई-फायलिंग सेंटर असून, या सेवेचा जास्तीत जास्त वकीलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांनी केले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, एआयआर व्हीजन इन्फिनिटी प्रा.लि. यांच्या सहकार्याने रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशन तर्फे हे ई-फायलिंग व फॅसिलिटी सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए.एस. राजंदेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश-2 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांच्यासह सर्व न्यायाधीश वर्ग, रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.प्रसाद पाटील, उपाध्यक्ष अॅड.अनंत पाटील, सचिव तथा रायगड जिल्हा ई-फायलिंग प्रमुख अॅड.अमित देशमुख, खजिनदार अॅड.राजेंद्र माळी, बार असोसिएशनचे इतर पदाधिकारी, सदस्य, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजंदेकर यांनी रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे कौतुक केले. ई-लायब्ररीनंतर उपलब्ध करुन दिलेली ई-फायलिंग सेंटर ही मोठी सुविधा आहे. जास्तीत जास्त वकीलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रसाद पाटील यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार अॅड.राजेंद्र माळी यांनी आभार मानले. तर अॅड.अमित देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.