उरण तालुक्यातील पूनाडे या गावामध्ये आढळले सुमारे आठशे वर्षापूर्वीचे नौका युद्धाचे पुरावे

By Raigad Times    23-Aug-2023
Total Views |
 new
 
उरण । उरण तालुक्यातील पूनाडे या गावामध्ये सुमारे आठशे वर्षापूर्वीचे नौका युद्धाचे पुरावे आढळून आले आहत. या शिल्पांच्या अभ्यासावरून हे युद्ध सुमारे आठशे वर्षापूर्वी झाले असावे असा अंदाज अभ्यासकांनी लावला आहे. कोकण इतिहास परिषद रायगड शाखेच्यावतीने उरण आणि पनवेल तालुक्यातील गावांचे पुरातत्वीय दृष्टिकोनातील सर्वेक्षण अनेक वर्षे सुरु आहे.
 
उरण येथील स्थानिक अभ्यासक आणि हाडाचे शिक्षक असलेले तुषार म्हात्रे यांनी सदर वीरगळ शिल्पाबाबत डॉ. अंजय धनावडे (अध्यक्ष कोकण इतिहास परिषद रायगड शाखा) यांना सांगितले. त्यामुळे सदर शिल्पे आणि परिसराचा आणखी अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून या  ठिकाणची पाहणी करण्यात आली. पूनाडे गाव उरणपासून सुमारे 18 किलोमिटर अंतरावर असून.
 
गावातील गावदेव बहिरी मंदिराच्या जवळ असलेल्या शेतात तीन वीरगळ शेजारी शेजारी उभे केलेले आहेत. यांना स्थानिकरित्या मामा-भाचे म्हणून ओळखले जाते. वीरगळांचा खालचा भाग मातीत गाडला गेला असून उर्वरित भागाची झीज झालेली पहायला मिळते. शिर्षभागी मंगल कलश असलेल्या वीरगळ शिल्पांची उंची सुमारे अडीच फूट असून ते तीन ते चार टप्प्यांत विभागले गेले आहेत.  एक वीरगळ पूर्णपणे 3/4 अवस्थेत आहे.उर्वरित दोन वीरगळ झीज झालेले आहेत.
 
यातील एका वीरगळाच्या तीन बाजू कोरल्या  गेल्या असून त्याच्या मधल्या टप्प्यात नौका युद्धशिल्पांकित केले आहे. शिल्पांचे नीट निरीक्षण केले असता त्याच्या खालच्या भागात चितेवर जळणारा वीराचा मृतदेह, त्याच्या वरील भागांच्या  मधल्या टप्प्यात नौका युद्ध कोरलेले आढळते. या युद्धात नौकेवर असलेले दोन योद्धे एकमेकांशी ढाल आणि तलवार घेऊन युद्ध करताना दिसतात. सर्वात वरच्या टप्यात स्वर्गप्राप्ती झालेला वीर शिवलिंगाची उपासना करताना दाखविला आहे. विशेष म्हणजे वीरगळावर दाखविलेल्या लाकडी नौका युद्धनौका नसून साध्या पद्धतीच्या आहेत.
 
अशा नौका आजही मासेमारीसाठी स्थानिक लोक वापरताना दिसतात. याशिवाय या ठिकाणी भूपृष्ठावर खापरांचे अवशेष आढळून आले असून त्यात काचेचा लेप असलेली एक रंगी (चेपेलहीेा ॠश्ररूशव थरीश), तेजस्वी लाल, पांढरी चमकदार (थहळींश ॠश्ररूशव थरीश), पांढर्‍यावर निळ्या रंगाची नक्षी असलेली अशी पूर्व मध्ययुगीन आणि मध्ययुगीन खापरे आढळून आली. या बाबत आणखी माहिती सांगताना डॉ. अंजय धनावडे पुढे म्हणाले की उरण तालुक्यास  ऐतिहासिक महत्त्व आहे. रानवड, चांजे, चिरनेर, आवारे यांसारख्या गावांमध्ये यापूर्वी देखील या भागात गजलक्ष्मी, वीरगळ, गद्धेगळ आणि सवत्स धेनुशिल्प म्हणजे गाय-वासरूसारखी प्राचीन इतिहासाची साक्षीदार असलेली शिल्पे आणि शिलालेख आढळून आले आहेत.
 
पुनाडे येथे आढळून आलेल्या सदर वीरगळावरील नौका युद्धावरून ही बाब निश्चित होते. एकूण शिल्पशैली वरून हे वीरगळ बाराव्या शतकातील असावेत असे म्हणता येते. येथील परिसरात आढळून आलेल्या मृदभांड खापरावरून या वरून हा परिसर दहाव्या शतकापासूनच चीन, इराण यांसारख्या ठिकाणांशी व्यापारात गुंतला होता हेही लक्षात आले. कोकण इतिहास परिषदेच्या या शोध मोहिमेत तुषार म्हात्रे, विजय गावंड, अभिषेक ठाकूर आणि महेश पाटील यांनी सहभाग घेतला.