पाली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर 27 ऑगस्ट रोजी मनसेची पदयात्रा होणार आहे. या पदयात्रेचा प्रारंभ पनवेल पळस्पे येथून युवा नेते अमित ठाकरे व रायगड सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याने या पद यात्रेकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. तर रायगड व कोकणातील माणसाच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या व जनहिताच्या मुंबई गोवा महामार्ग प्रश्नाला न्याय देण्यासाठी मनसे ताकतीने मैदानात उतरल्याने जन माणसाचा देखील या जनजागृती अभियान व पदयात्रेला भरभरून पाठिंबा मिळणार आहे.
त्यानंतर कोलाड नाक्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. युवा नेते अमित ठाकरे यांचा पहिल्या टप्प्यातील पनवेल पळस्पे ते पेण पर्यंतच्या पदयात्रेत सहभाग असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पेण ते नागोठणेपर्यंत बाळा नांदगावकर यांचा सहभाग राहणार आहे. तिसऱ्या टप्प्यात नागोठणे ते कोलाड आमदार राजुदादा पाटील पदयात्रेत सहभागी असतील.कोलाड ते इंदापुर या टप्प्यात नितीन सरदेसाई पदयात्रेत आहेत.
मनसेची नेते मंडळी रस्त्यावर उतरणार असल्याने मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. पदयात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड व स्थानिक पदाधिकारी यांच्यावर आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर रायगड सह कोकणातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली, यावेळी या पद यात्रेचे नियोजन करण्यात आले. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड व सर्व मनसैनिक मेहनत घेत आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर आजवर झालेल्या अपघातात अडीच हजारहून अधिक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे, हजारो प्रवाशी नागरिक जायबंदी झाले आहेत.राज्यातील व देशातील मागून सुरू झालेले रस्ते जोड प्रकल्प पूर्णत्वास आले मात्र मुंबई गोवा महामार्गाला न्याय देण्यात राजकीय नेतेगण अयशस्वी ठरले आहेत.
आज घडीला हा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरली असल्याने कोकणवासीय जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. या लढ्यात सामाजिक संघटना, चालक मालक वाहतूक संघटना व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी होणारी पदयात्रा सरकारला जागे करणारी होईल असं मनसे कार्यकर्ते सांगत आहेत.