कामोठेत डेंग्युचा पहिला बळी; प्रत्येक सोसायटीत धूरफवारणी करण्याची कॉलनी फोरमची मागणी

By Raigad Times    11-Sep-2023
Total Views |
dengue 
 
पनवेल : कामोठे वसाहतीमध्ये नीट परिक्षेचा सराव करणार्‍या एका 17 वर्षीय तरुणीचा डेंग्यु आजारावर उपचार घेत असताना नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे कामोठे वसाहतीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. जेथे डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण सापडतात त्याच गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात धूर फवारणी केली जाते, असे पालिकेचे धोरण असल्याची तक्रार करत कामोठे कॉलनी फोरमच्या सदस्यांनी सोमवारी पालिकेच्या आरोग्य विभागाची भेट घेऊन वसाहतीमध्ये सरसकट धूर फवारणी करण्याची मागणी केली. तसेच तातडीने धूर फवारणी करून डेंग्यूचे डास निर्माण होणार्‍या केंद्रांची शोध मोहीम पालिकेने हाती घेण्यासाठी निवेदन दिले.
जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात 241 रुग्ण डेंग्यु आजाराचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे नोंदवले गेले आहेत. जुलै महिन्यात 115 तर ऑगस्ट महिन्यात 126 रुग्ण आढळल्याची माहिती पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांनी दिली. कामोठे सेक्टर 21 मधील गुरुदेव हाईट्स या इमारतीचे प्रतिनिधी सोमवारी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांची भेट घेण्यासाठी आले होते. मृत विद्यार्थींनीवर मागील आठवड्यापासून उपचार सूरु होते. मात्र दोन दिवसांपासून प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तीला बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल केल्याचे कामोठे कॉलनी फोरमचे डॉक्टर सखाराम गारळे यांनी सांगीतले.
 
कामोठे वसाहतीमध्ये प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीत 2 रुग्ण डेंग्यूचे असल्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय कृती योजना पालिकेने हाती घ्यावी. पालिकेने डेंग्यू रोखण्यासाठी प्रत्येक सोसायटीत जनजागृती मोहीमेत डेंग्यूचे लक्षणे व खबरदारी यांविषयी पालिकेने माहिती पत्रक प्रसिद्ध करावी, अशी नागरिकांची मागणी असल्याचे कॉलनी फोरमच्या सदस्यांनी सांगीतले. तसेच गेल्या दोन आठवड्यात, कामोठे वसाहतीमधील सेक्टर 6, 6 अ आणि 7 यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर फोरमच्या सदस्यांनी पालिकेच्या कामोठे कार्यालयाकडे धूर फवारणीची माहिती विचारल्यावर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी धूर फवारणी फक्त डेंग्यू रुग्ण आढळणार्‍या सोसायट्यांमध्ये आणि फक्त तळमजल्यावर केली जात असल्याचे सांगितल्यामुळे कामोठे कॉलनी फोरमच्या सदस्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधला
 
पनवेल पालिका क्षेत्रात प्रत्येक रुग्णालय आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांना साथरोगाचे रुग्ण आढळल्यास 24 तासांत पालिकेच्या पोर्टलवर त्याची माहिती देण्याविषयी सूचना केल्या आहेत. ज्या प्रयोगशाळा माहिती देत नाहीत त्यांच्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल. मागील दोन महिन्यापासून डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढले असून पालिका रुग्ण आढळल्यास त्या इमारतीच्या मजल्यावरील आणि सोसायटीतील डास प्रतिबंधक कार्यक्रमाप्रमाणे कार्यवाही करते. संबंधित रुग्णांच्या कामोठे येथील सोसायटीत 26 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर अशा दोनवेळा धूर फवारणी केली होती. डेंग्यू आजाराने मृत्यू झालेल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाच्या घरी दोन ठिकाणी झाडे ठेवण्याची कुंडीत डासांची पैदास झाल्याचे आढळले आहे. नागरिकांकडून सरसकट वसाहतीमध्ये धूर फवारणी करण्याची मागणी होत आहे. याविषयी लवकरच वरिष्ठ निर्णय घेतील’, असे पनवेल पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी म्हटले आहे.