अमली पदार्थांच्या कारवाई;नागाव ग्रामपंचायत सदस्यासह दोघे अटकेत

By Raigad Times    30-Sep-2023
Total Views |
 uran
 
उरण । ट्रॉम्बे पोलिसांनी मानखुर्द महाराष्ट्र नगर मधून 6 किलो 44 ग्राम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. याची किंमत 30 लाख 22 हजार असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सदर आरोपी हे उरणमधील वास्तव्यास असून एकजण नागाव ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आलेला आहे.
 
मानखुर्द महाराष्ट्र नगर मधील पत्राचाळ इमारत क्र. 8 च्या पाठीमागील रस्त्यावर दोन व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र रणशेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक शरद नाणेकर, पो. उप. निरीक्षक माळवदकर, आव्हाड, धुमाळ, प्रदीप देशमुख, कासार व त्यांच्या पथकाने सापळा रचून नदीम मोहम्मद इंद्रिस शहा (30) व अक्षय वाघमारे (26) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 लाख 22 हजार किंमतीचे 6 किलो 44 ग्राम वजनाचे चरस नावाचा अंमली पदार्थ जप्त केला. दोघेही आरोपी रा. उरण नागाव पिरवाडी, येथील राहणारे आहेत. त्यातील अक्षय वाघमारे हा नागाव ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आला आहे.
 
उरणमध्ये नशिली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे वृत्त अनेकवेळा प्रसिद्ध होऊनही ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही. आजच्या घडीला उरणमधील नागाव पिरवाडी समुद्र किनारी बंदर विभागाच्या जागेवर बेकायदेशीर उभ्या असलेल्या टपर्‍यामधून खुलेआम विक्ती होत आहे. दिवसभर या ठिकाणी विक्री करणारे दलाल तर नशेत असलेली तरुण मुले पहावयास मिळत आहे.
 
उरणमधील टपर्‍यावर गुटख्यासह इतर नशिली पदार्थांची विक्री छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे नागरिक सांगतात. अशा नशिली पदार्थांची विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे.