अलिबाग । डिजेच्या तालावर थिरकणारी पावले आणि जल्लोषात धुंद झालेली तरूणाई, किनार्यांवर ओसंडून वाहणारी गर्दी.31 डिसेंबरच्या रात्री रायगडात सर्वत्र असेच वातावरण होते. जिल्ह्यात आलेल्या हजारो पर्यटकांसह रायगडकरांनी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात केले. पर्यटक आणि स्थानिक नागरीकांनी रायगडचे प्रमुख समुद्रकिनारे अक्षरशः फुलून गेले होते. रात्री अलिबाग बीच शो पर्यटकासांठी आकर्षण ठरले.
रायगडच्या किनार्याना पर्यटकांची पसंती आहे. त्यामुळे नववर्ष स्वागतासाठी हजारो पर्यटक अलिबागसह नागाव, किहीम, काशिद , मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धनच्या किनार्यांवर दाखल झाले होते. 2023 च्या शेवटच्या मावळत्या सुर्याला निरोप देण्यासाठी सायंकाळी पर्यटकांनी गर्दी केली होती. रात्री ठिकठिकाणी पर्यटकांच्या पाटर्या सुरू होत्या.
अनेक हॉटेल्समध्ये डिजेची व्यवस्था करण्यात आली होती. समुद्रकिनारी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी संस्थांनी पर्यटन महोत्सव, बीच शोचे आयोजन केल्याने नागरीकांचे मनोरंजन झाले.‘अलिबाग बिच शो’ सर्वांसाठी आकर्षण ठरले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, अलिबाग पोलीस निरिक्षक बांगर, आरसीएफचे महा व्यवस्थापक एचआर संजिव हरळीकर, जपनसंपर्क अधिकारी संतोष वझे, कामगार नेते दिपक रानवडे, अर्जुन पाटील आदी मान्यवरांची यांची उपस्थिती लाभली.
‘अलिबाग बिच शो’ मध्ये जुन्या नव्या हिंदी मराठी गाण्यांसह रायगडच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी पारंपारीक नृत्याची मेजवानी पर्यटकांना चाखायला मिळाली. डिजेच्या तालावर थिरकत पर्यटकांनी थर्टीफर्स्टचा आनंद लुटला. रात्री ठिक अकरा पंचावन वाजता काऊंडान सुरु झाला आणि ठिक रात्री 12 वाजताच सर्वांनी एकच जल्लोष केला. शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करीत नवीन वर्षाचे स्वागत केले.
किनारा माणसांनी अक्षरशः फुलून गेला होता. अनेक पर्यटकांनी पॅराशूट आकाशात सोडून सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत केले.किनारपट्टी बरोबरच कर्जत खालापूर तालुक्यातील अनेक फार्महाऊसेस हाऊसफुल्ल झाली होती. माथेरानमध्येही पर्यटकांचा उत्साह टिपेला पोहोचला होता. तेथेही मुंबई , पुणेकर मोठ्या संख्येने आपल्या कुटुंब, मित्रमैत्रिणींसह दाखल झाले होते.
नववर्ष स्वागताचा हा माहोल दिवसभरदेखील सुरू होता .जल्लोषाच्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समुद्रकिनारी झालेली पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून पोलीसांनी विशेष दक्षता घेतली जात होती.
दरम्यान, पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. रस्त्याची दुरवस्था आणि वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पर्यटकांनी जलवाहतुकीला पसंती दिली, दोन दिवसात जवळपास 30 हजार पर्यटक जलवाहतुकीने मांडवा बंदरात दाखल झाले. तसेच तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दारूच्या दुकानाबाहेर दुधाचे वाटप केले . ‘द’ दारुतला नव्हे तर ‘द’ दुधातला असा संदेश देणारे फलक हातात घेऊन हे कार्यकर्ते दुध वाटत होते.