रायगडमधून पहिली आंब्याची पेटी बाजारात दाखल

By Raigad Times    20-Jan-2024
Total Views |
 pali
 
पाली /बेणसे । कोकणातील लोकप्रिय हापूस आंब्याची संपुर्ण जगभर ख्याती आहे. यंदाच्या हंगामात रायगड जिल्हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान सलग तिसर्‍या वर्षी अलिबाग येथील रहिवासी तर रोहा वराठी येथील बागायतदार यांना मिळाला आहे.
 
रोहा तालुक्यातील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांनी दि. 19 जानेवारी 2024 रोजी प्रत्येकी दोन डझनाच्या हापूस च्या 4 आणि केशर च्या 4 पेटयांची अश्या एकूण 8 बॉक्स ची काढणी करून आंबा वाशी बाजारात पाठवला आहे.यंदादेखील आंबा बागायतदारांवर निसर्गाने अवकृपा केली आहे.
 
सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. लांबणारा पाऊस, खराब हवामान, पिकांवर येणारे आजार, फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असून त्यावर करण्यात येणार्‍या उपाययोजना यामुळे खर्चात वाढ होते. तरीदेखील अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून वरूण संजयकुमार पाटील यांनी यशस्वीरित्या आंब्याची काढणी करून रायगड जिल्हयातून पहिला आंबा बाजारात पाठवण्याचा मान पटकावला आहे.
 
pali
 
कोकणातील हापूस आंब्याला विशिष्ट सुगंध असतो, इतर आंब्यांच्या तुलनेत त्याचा गोडवा ही चांगला असतो. हापूस आंबा हा कोकणातील हवामानातच चांगले उत्पन्न देत असतो. हे पीक कोकणातील विविध भागात चांगल्या प्रकारे घेता येते. त्यामुळे कोकणातील पाचही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर ठाणे या पाचही जिल्ह्यांना हापूसचे जी आय मानांकन प्राप्त झाले आहे.
 
कर्नाटक, केरळ आणि परराज्यातून येणारा आंबा याला हापूसची सर नाही. कोकणातील हापूस आंब्याची विशिष्ट चव, गोडी आणि सुगंध जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतो.सध्या पहिल्या पेटीचा भाव 10 हजार रुपये इतका असून पुढील आंबा पीक सरासरीपेक्षा कमी असल्याची शक्यता वरूण पाटील यांनी वर्तवली आहे.
 
हा आंबा त्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला आहे .जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी वरूण यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील हंगामासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रायगड कोकणातील हापूस आंबा जगभरातील खवय्यांना भुरळ घालतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हापूसला येणारा सुगंध, विशिष्ट चव, रंग यामुळे हापूसची बातच न्यारी आहे. आंबा उत्पादन अधिक झाल्यास कोकणातील शेतकरी सधन व समृद्ध होतो. यंदा हापूसचे चांगले पीक येईल व कोकणातील हापूस महाराष्ट्र, देश आणि जगभरात पोहचेल अशी अपेक्षा आहे. - वरुण पाटील, आंबा बागायतदार