माणगांव । माणगांवची सुकन्या, ग्रामसेवक राजेंद्र तेटगुरे यांची मुलगी सोनाली राजेंद्र तेटगुरे ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी.) परीक्षेत चिकाटी, जिद्द व मेहनतीने अभ्यास करत अव्वल श्रेणीत उत्तीर्ण झाली. सोनालीने हे यश संपादीत करुन आई-वडिलांसह तालुक्याचा तसेच रायगड जिल्ह्याचा नावलौकीक वाढविला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल माणगांवकरांसह जिल्हाभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माणगाव तालुक्यातील ढालघर येथील सोनाली तेटगुरे हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे 2016 साली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पदवी मिळवत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील सेंजर या आयटी कंपनीत तीन वर्षे जॉब केल्यानंतर, सोनालीने जॉबचा राजीनामा देत एमपीएससीचा अभ्यास सुरु केला.
माणगांवचे प्रांत डॉ.संदिपन सानप, तहसीलदार विकास गारुडकर, मुख्याधिकारी संतोष माळी व तिचे मामा कृषी अधिकारी प्रमोद देशमुख यांनी वेळोवेळी तिला मार्गदर्शन केले.तिची आई सर्वसामान्य गृहिणी तर वडिल ग्रामसेवक आहेत. एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या सोनालीच्या या यशात आईवडिलांची चांगली साथ व भक्कम पाठबळ मिळाले.
सोनालीने पहिल्याच प्रयत्नात आपली ध्येयपूर्ती करत स्वप्नवत यश संपादन केले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तरुणाईने सोनालीचा आदर्श घेतला व ध्येय निश्चित करुन मेहनत जिद्दीने अभ्यास केला तर आपणही असे यश खेचून आणू शकतो, याचा सोनालीचा उत्तम आदर्श घालून दिला आहे.