म्हसळा । म्हसळ्यात श्री प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा, होमहवन, अभिषेक कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला, संपूर्ण तालुक्यात श्री प्रभू रामचंद्राच्या नावाचा जल्लोष करण्यात आला.
आयोध्येतील श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिर उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे औचित्य साधून म्हसळा येथील श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिरात पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंडीत महेश जोशी यांच्या मंत्रघोषात हिंदू ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. व सौ. नंदकुमार वसंत गोविलकर यांच्या शुभ हस्ते अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला.
संपूर्ण शहरात ध्वज, पताके आणि रांगोळ्यांनी शहरात सुंदर, मनमोहक अशी सजावट करून सर्वत्र आनंदी वातावरण करण्यात आले होते. संपूर्ण दिवसभर श्री प्रभू रामचंद्राचा जयघोष सुरु होता.तालुक्यातून अनेक ग्रामस्थ, मान्यवरांनी श्री प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन कार्यक्रमांची शोभा वाढविली. सायंकाळी 5 वाजता शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत म्हसळा तालुक्यातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला.