मुरूड-एकदरात धुक्याऐवजी ‘धुराची चादर’

कारवाई होत नसल्याने भंगारवाल्यांना मोकळे रान;ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

By Raigad Times    25-Jan-2024
Total Views |
murud
 
कोर्लई । मुरूड-एकदरा परिसरात पहाटेच्या वेळी धुक्याऐवजी प्लॅस्टिकच्या विषारी धुराची चादर पसरत आहे. या परिसराला विषारी वायूचा विळखा पडत आहे. मॉर्निंग वॉक घेणार्‍यांना ऑक्सिजनऐवजी प्रदुषित विषारी वायूचा श्वास घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या भंगारवाल्यांवर कारवाई होत नसल्याने रान मोकळे झाले आहे.
 
या परिसरात भंगारवाले भंगारमध्ये मिळणार्‍या केबल जमा करून यातील तांब्याच्या (कॉपर) तारा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाळ करून प्लॅस्टिक पासून निर्माण होणारा विषारी वायू सोडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत आहेत. या धुराचे प्रमाण इतके असते की संपूर्ण परिसरात धुक्याऐवजी विषारी धुराची चादर पसरलेली पहावयास मिळते आहे.
 
पहाटे स्वच्छ हवेत ऑक्सिजन मिळवण्यासाठी अनेक नागरिक व ग्रामस्थ फिरायला येत असतात. या फिरणार्‍यांना ऑक्सिजन ऐवजी प्रदुषित विषारी प्लॅस्टिक धुराचा श्वास घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आणि या प्रदुषण करणार्‍या भंगारवाल्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी करीत आहेत. तरी प्रशासन गंभीर दखल घेत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.