रायगडात बैलगाडी शर्यत परवानगीचे अधिकार आता प्रांताधिकार्‍यांकडे

By Raigad Times    09-Jan-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग । बैलगाडी शर्यत परवानगीचे अधिकार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी आता त्या त्या विभागिय अधिकार्‍यांकडे दिले आहेत. हे अधिकार शासनाने जिल्हाधिकारी यांना प्रदान केले होते. मात्र अर्ज केल्यानंतर प्रक्रियेसाठी लागणार वेळ लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलेल्या नियम व अटी शर्तीचे काटेकोरपणे पालन करुन, राज्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यात येत आहे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार सरकारने परिपत्रक काढून राज्यातील बैलगाडी शर्यती आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आली आहे.
 
महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणार्‍या यात्रा, जत्रा, उत्सव अशा प्रसंगी रायगड जिल्हयात बैलगाडी शर्यती परवानगी मिळणेबाबतचे अर्ज मोठया प्रमाणावर प्राप्त होत आहेत. हे अर्ज प्राप्त झालेनंतर 7 दिवसांचे आत बैलगाडी शर्यतीसाठी परवानगी देण्याबाबत नमूद आहे. तथापि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव मुदतीत सादर झाल्यानंतर अभिप्राय प्राप्त होण्यास बराच अवधी लागत असतो.
 
त्यामुळे बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यासाठी प्रदान केलेले सर्व अधिकार, जिल्हाधिकारी रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी रायगड जिल्हयातील उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाचे कार्यक्षेत्रामध्ये बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.
 
सुचित करण्यात आलेल्या सूचना, नियम व अटी शर्तीचे पालन करुन, बैलगाडी, शर्यतीस परवानगी देणेची कार्यवाही करावी तसेच परवानगी देताना शासन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन अधिसूचना, शासन निर्णय, शासन परिपत्रक यामध्ये दिलेल्या अटी व शर्तीचे देखील काटेकोरपण पालन होईल याची दक्षता घ्यावी.