पनवेल | नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कळंबोलीत बेकायदापणे वास्तव्यास असलेल्या ३ बांगलादेशी महिला विरोधात कारवाई केली आहे. चमिली पप्पुहशमेर सिखडे, (३८ वर्ष), हमिदा शुकरीशौदत गाझी, (२७ वर्ष) व सलमा मोशियर शेख, (२९ वर्ष) अशी कारवाई केलेल्या बांगलादेशी महिलांची नावे असून या सर्व महिला घरकाम करणार्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे, यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बेकायदेशीर वास्तव्यास असणार्या बांगलादेशी नागरीकांवर कारवाई करण्याचे आदेश अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास दिले होते. त्यानुसार एएचटीयु पथकाच्या एपीआय अलका पाटील यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामा नामा भगत चाळ, सेटर ०३, कळंबोलीगांव येथे बांगलादेशी नागरीक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असुन ते सकाळी ०६ ते ०७.३० वाजेच्या दरम्यान कामावर निघुन जात असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने, नमूद ठिकाणी पथकासह सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास सदरठिकाणी छापा टाकला. यावेळी सदर ठिकाणाहून ०३ महिला मिळुन आल्या. या महिलांकडे पथकास भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागदपत्रे मिळुन न आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता, घुसखोरीच्या मार्गाने भारत बांगलादेश सिमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवुन व स्थानिक मुलकी अधिकार्यांच्या पुर्व परवानगीशिवाय व कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय मागील दहा ते पंधरा वर्षा पासुन भारतात प्रवेश करून त्या राहत असल्याचे उघडकीस आले. दरम्यान, सदर महिला त्या भारतीय नागरीक असल्याबाबत कोणताही पुरावा सादर करू शकल्या नसल्यानेत्यांच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाणे येथे पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० कलम ३(ए)सह ६(ए), व विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास कळंबोली पोलीस करत आहेत.