कोंढाणे धरणासाठी सिडकोकडून २५०० कोटीचे अंदाजपत्रक

By Raigad Times    14-Oct-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत | कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर बांधण्यात येणार्‍या कोंढाणे धरणाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात १४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोंढाणे धरणसिडको महामंडळ बांधणार असून हे धरण बांधण्यासाठी २५०० कोटी खर्च येणार असून कर्जत तालुक्यातील कोंढाणे येथून पाणी उचलून नवी मुंबईत नेले जाणार आहे.
 
या प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार असून या प्रकल्पामुळे या भागातील २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या प्रकल्पग्रस्त यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी वर्षांपासून सिडको बांधणार असलेले धरणाचे काम लवकर सुरु व्हावे यासाठी पर्यटन केले आणि आता धरणाचे कामासाठी १४०० कोटींचा निधी मंजूर करून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास व्हावा, म्हणून शासनाने २७० गावांलगतचे ४७४ किलोमीटर क्षेत्र हे नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैना क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रात विमानतळ, एसईझेड, कॉर्पोरेट आणि मनोरंजन या व्यावसायिक उपक्रमांबरोबर सिडको नैना नागरी क्षेत्र विकसित करीत आहे. या सर्व क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असल्याने या प्रकल्पाला प्राधान्य दिले आहे.
 
त्यामुळे नैना क्षेत्रापासून ३० ते ३५ किलोमीटर लांब आणि कर्जत शहरापासून १३ किलोमीटर दूर असलेल्या कोंढाणे धरणाचा पर्याय निवडण्यात आला आहे. या धरणाच्या पाण्यावर स्थानिक परिसरातील २५० हेक्टर जमिनीवर उन्हाळ्यात शेती देखील फुलणार आहे.तर धरणाचे पाण्यामुळे उन्हाळ्यात कोरडी असलेली उल्हास नदी बारमाही वाहणार आहे.
आ.महेंद्र थोरवे यांची भूमिका ..
कोंढाणे धरण शासनाने सिडको महामंडळ यांना देण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेतला होता. पाणी टंचाईसाठी धरण महत्वाचे होते. त्यात धरणामुळे उन्हाळ्यात कोरडी असलेली उल्हास नदी बारमाही वाहती होणार असल्याने आ. थोरवे यांच्याकडून कर्जतसाठी महत्वाचे असलेल्या धरणाला मंजुरी मिळावी यासाठी मोठे प्रयत्न केले.