सागरी महामार्गावरील ७ पुलांचे भुमिपूजन! रेवस-करंजा पुलाच्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

14 Oct 2024 13:03:39
 alibag
 
अलिबाग | रेवस-करंजासह बॅ. ए. आर अंतुले यांनी पाहिले सागरी महामार्गाचे स्वप्न चाळीस वर्षांनंतर दृष्टीक्षेपात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रविवारी या कामांचे भुमीपूजन केले. ७ हजार ८५१ कोटी इतका खर्च अपेक्षीत असणार्‍या कोकणातील एकूण सात पुलांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
 
यात रेवंदडा, आगरदांडा आणि बांगमांडला-बाणकोट पुलांचाही समावेश आहे.सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ते रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी वाशी येथे संपन्न झाले.
 
alibag
 
यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते. सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवर-करंजा पुल, रेवदंडा-मुरुडला जोडणारा कुंडलिकावरील पुल, आगरदांडा-दिघी पुल, बागमांडला- बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पूलांचे भूमीपूजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले.
 
तसेच स्थानिक पातळीवर प्रत्येक खाडी पूलाच्या कामाचे प्रत्यक्ष भूमीपूजन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या सात खाडी पूलांची एकूण लांबी २६.७० किलोमीटर असून त्यासाठी ७ हजार ८५१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
 
alibag
 
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती. ती मागणी आज पूर्ण होतेय. हा योगायोग आहे. या खाडी पूलांमुळे कोकणाचा विकास होईलच, तसेच पर्यटनाला चालना मिळेल. कोकणवासियांसाठी ही दिवाळीची भेटच आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या माध्यमातून राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत.
 
त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात तासात पोहोचता येईल. पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येईल. यावेळी मंत्री दादा भुसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

alibag
 
रेवस करंजा पुल हे अलिबागकरांचे ४० वर्षांपुर्वीचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. या पुलामुळे माझ्या खारेपाट विभागाचा कायापालट होणार आहे. तसेच अलिबाग आणि मुरुड तालुके मुंबई आणि नवी मुंबईला जोडले जाणार आहेत. तिन वर्षात हा पुल पुर्ण होईल. बॅ. अंतुले यांनी पाहिलेल्या या स्वप्न साकार करण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे. यासोबतच रेवदंडा आणि आगरदांडा पुलाचेही काम सुरु होत आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारला धन्यवाद देतो. - महेंद्र दळवी, आमदार, अलिबाग-मुरुड
रेवस-करंजा पूल
पुलाची लांबी : १०.२० किमी.
प्रशासकीय मान्यता : ३ हजार ५७ कोटी
पूलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पूल)
कामाची मुदत : ३ वर्ष
पूलाचा प्रकार : केबल स्टे
रेवदंडा- साळाव
पुलाची लांबी : ३.८२ किमी.
प्रशासकीय मान्यता : १ हजार ७३६ कोटी
कामाची मुदत : ३ वर्ष
पूलाचा प्रकार : केबल स्टे
दिघी-आगरदांडा
पुलाची लांबी : ४.३१ किमी.
प्रशासकीय मान्यता : १ हजार ३१५ कोटी
कामाची मुदत : ३ वर्ष
पूलाचा प्रकार : केबल स्टे
बागमांडला बाणकोट
पुलाची लांबी : १.७११ किमी.
प्रशासकीय मान्यता : ४०८ कोटी
कामाची मुदत : ३ वर्ष
Powered By Sangraha 9.0