मांडवा जेट्टी नव्हे, प्रवाशांसाठी असुविधांची जेट्टी..!! मांडवा जेट्टीवरील शेडचे पत्रे गायब, दुरुस्तीचे काम कासवगतीने

14 Oct 2024 17:43:17
 mandwa
 
सोगाव | मुंबईपासून जवळ व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या मिनी गोवा म्हणून संबोधले जाणार्‍या अलिबाग मुरुडकडे जाण्यासाठी गेटवे ते मांडवा जलमार्गाने प्रवास करताना मांडवा जेट्टीवर मोठ्या प्रमाणात गैरसोय दिसून येत आहे. जलवाहतूक सुरू होऊन एक महिना दहा दिवस झाले तरी प्रवाशांच्या सुखसोयीबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याबद्दल या मार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी व पर्यटकांनी महाराष्ट्र सागरी मंडळ प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई गेटवे ते मांडवा अलिबाग या जलमार्गावरीलजलवाहतूक पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव जून, जुलै व ऑगस्ट असे तीन महिने बंद करण्यात येते. यानंतर १ सप्टेंबरपासून वातावरणाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आदेशानुसार यामार्गावरील प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यात येते. गेल्या महिन्यात १ सप्टेंबर पासून जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे, मात्र मांडवा जेट्टीवर अनेक प्रकारच्या सुविधांच्या संबंधित असलेल्या उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सागरी मंडळ प्रशासन वारंवार हलगर्जीपणा करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
 
मांडवा जेट्टीवरील जेट्टी ते वाहनतळ हे अंतर जास्त आहे, जेट्टीवर ये- जा करण्यासाठी असलेल्या मार्गावरील शेडचे गंजलेले पत्रे काढण्यात आली आहेत, मात्र ते पत्रे एक महिना होऊन गेला तरी त्यावरील पत्रेटाकण्यात आले नाहीत. शेडवर पत्रे टाकण्याचे काम हे प्रवासी वाहतूक बंद झाली होती तेव्हाच हे काम करण्याची गरज होती, पण हे काम आता अधिमधी करीत असताना गंजलेले लोखंडी बार खाली पडत आहेत, हे शेडवरील पत्रे किंवा लोखंडी वस्तू प्रवाशांच्या अंगावर पडून अपघात होण्याची दाट शयता नाकारता येत नाही.
 
जेट्टीवरील मोठ्या शेडवरील पत्रे ठिकठिकाणी उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी पत्रे खिळखिळे झाले आहेत, हे पत्रे सुद्धा खाली उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावर पडून अपघात होऊ शकतो याबद्दल दुमत नाही. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
 
याठिकाणी शेडवर पत्रे नसल्याने ये-जा करणार्‍या प्रवाशांना नाहक पावसात भिजत प्रवास करावा लागत आहे, तसेच आता पावसाळा संपल्यावर यापुढे भर उन्हात प्रवास करावा लागणार आहे. जेट्टीवरील ठिकाणी जेट्टी ते वाहनतळ ठिकाणी ये- जा करताना दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, स्तनदा माता व आजारी रुग्णांच्या सेवेसाठी असलेल्या वाहनांची संख्या १ ते २ असून प्रवाशांची संख्या लक्षात घेता तीसुद्धा सेवा देण्यासाठी अपुरी व कमी पडत आहे, यामुळे शारीरिक क्षमता कमजोर असलेल्या प्रवाशांना सामानसुमानासह चालत जाताना मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
यासोबतच जेट्टीवर प्रवाशांना मोफत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना अधिकचे पैसे देऊन विकतचे पाणी प्यावे लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागतो आहे. आजारी रुग्ण, दिव्यांग, यांना बोटीतून चढ उतार करताना व्हीलचेअरची सुविधा नसल्याने या प्रवाशांच्या हालाला पारावर उरत नाही. यासोबतच बोटीवर जाण्यासाठी वाट पाहत रांगेत उभे राहत असलेल्या ठिकाणी प्रवाशांना बसण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्याने गरोदर माता, स्तनदा माता, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदींना ताटकळत उभे राहावे लागत आहे. याठिकाणी असलेल्या गैरसोयीबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळ प्रशासन कधी जागे होऊन कधी लक्ष देतील,? हा मोठा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
जलवाहतूक सुरु होऊन सव्वा
महिना झाला तरी प्रवाशांची
ऊन - पावसात होत आहे
मोठी गैरसोय, महाराष्ट्र सागरी
मंडळाचे दुर्लक्ष...
Powered By Sangraha 9.0