एनएमएमटी बसेसमधून महिलांसाठी आता अर्ध्या तिकीटात प्रवास , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; महिला प्रवासी खुश

By Raigad Times    14-Oct-2024
Total Views |
 new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटी बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के म्हणजे हाफ तिकीटात प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भुमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ऑलिंपिक आकाराचा तरणतलाव, महिलांसाठी कॅन्सर तपासणी सुविधा, १० बेडचा केमोथेरपी वॉर्ड, शाळा, मार्केट, आरोग्य केंद्र, जलकुंभ, ई-बसेस, ई-चार्जिंग अशा ४१० कोटीहून अधिक रक्कमेच्या विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असल्याचे सांगितले.
 
पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते, आता महानगरपालिका कापडावर पुनर्प्रक्रिया करणार आहे, अशा वेगळया प्रकारच्या आधुनिक प्रकल्पाचा लोकांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको यांच्या वतीने वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात विविध नागरी सुविधा, प्रकल्प यांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न्? झाला, त्यावेळी ते बोलत होते.
 
याप्रसंगी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक विजय सिंघल, नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. माझी लाडकी बहीण योजनेत नवी मुंबईतील १ लाख ४५ हजारहून अधिक महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून नवी मुंबईत चांगले काम झाल्याचा अभिप्राय दिला.
 
संयुक्त्? राष्ट्र विकास कार्यक्रम अंतर्गत परिसर सखी वस्ती संघामधील १० महिला वाहन चालकांना इलेक्ट्रिक वाहनाची चावी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना मागील वर्षी दिवाळीला ३० हजार सानुग्रह अनुदान मिळाले होते.
 
यावर्षी त्यामध्ये ३ हजाराची भरीव वाढ करीत ३३ हजार सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी शहरातील नागरिकांना अपेक्षित असणार्‍या व त्यांना अधिक सुविधा देणार्‍या दर्जेदार कामांची पूर्तता महानगरपालिका करीत असून त्यामधील २५ महत्वाच्या सुविधांचे व प्रकल्पांचे लोकार्पण झाल्याने आनंद व्यक्त केला.