जेएसडब्ल्यू कंपनीला न्यायालयात खेचणार , जेएसडब्ल्यूच्या मनमानीमुळे पंडित पाटील संतापले

प्रदुषण, वाहतुक कोंडी, स्थानिकांना रोजगार असे विविध प्रश्न केले उपस्थित

By Raigad Times    15-Oct-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | जेएसडब्ल्यू कंपनी ही रायगडकरांसाठी शाप कि वरदान आहे तेच समजेनासे झाले आहे. या कंपनीकडून जल, वायू, ध्वनी या सर्वच पातळ्यावर प्रदुषण सुरु आहे. रस्त्यावरील पार्कींग, अवजड आणि बसेसची वाहतुक, स्थानिक नोकर भरती असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कंपनी जिल्हा प्रशासनालाही जुमानत नाही.
 
त्यांच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा माजी आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. जेएसडब्लू कंपनीविरोधात पंडित पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत निवेदन दिले. आठवड्याचा पहिलाच दिवस असूनही कार्यालयात एकही वरिष्ट अधिकारी नसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. सरकारी अधिकारी शासन निर्णयाची पायमल्ली करत असतील तर सामान्यांनी जायचे कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
 
alibag
 
जेएसडब्लू कंपनीचे दुषित सांडपाणी धरमतर खाडीत सोडले जाते अशी तक्रार ग्रामस्थांनी फोटोसहीत अनेकदा केली आहे. तसेच या कंपनी मधून मोठ्या प्रमाणावर दुषित वायू व धूळ सोडल्यानेनागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. धरमतर खाडीमध्ये खोदकाम करण्यात येत असल्याने भविष्यात बांध बंधीस्ती तुटण्याचा धोकाही नाकारता येत नाही अशी भीती पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे. जेएसडब्लू कंपनीकडून नोकर भरतीत स्थानिक तरुणांना डावलले जाते.
 
कंपनी प्रचंड मोठी आहे, पण स्थानिक तरुणांना रोजगार कीती याची माहिती मिळत नाही. कंपनीची अनेक अवजड वाहने राष्ट्रीय महामार्गावरच उभी असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अवजड वाहतुकीमुळे रस्तेदेखील खराब होतात. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे इतकी मोठी कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यूची स्वतःची वसाहत नाही आहे.
 
त्यामुळे कर्मचार्‍यांना ने आण करण्यार्‍या बसेसमुळे वाहतुक कोंडीचा सामना, अलिबाग, पोयनाड पेझारीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरीकांना करावा लागतो. या बसेसमुळे काही अपघातही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कंपनीच्या दंडेलशाहीमुळे त्रास होऊनही नागरीक उघडपणे बोलणे टाळत असतात. सीएसआर निधी वापरताना कुठलेही नियम पाळले जात नाहीत. कंपनी प्रशासनाकडून गोड बोलून वेळ मारून नेली जाते, आजपर्यंत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना व आदेशाला कंपनीने सतत केराची टोपली दखवीलेली आहे.
 
अशा मुजोर कंपनीचे अधिकारी सूचना व आदेश मानत नसतील शेकाप अशा मुजोर अधिकार्‍यांना धडा शिकविण्यासाठी समर्थ आहे असा इशाराही पंडित पाटील यांनी दिला आहे. पेण व अलिबाग तालुक्यातील शेतकरी, उपविभागीय अधिकारी, खारभूमी अधिकारी व कंपनीच्या जबाबदार व निर्णयक्षम अधिकारी यांच्यासोबत बैठक लावावी.
 
तसेच मागील पाच वर्षात कंपनीने फंडातून केलेल्या कामांची माहिती व किती स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला याची माहिती बैठकीत द्यावी अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे. दरम्यान, जेएसडब्लू कंपनी जर कोणाचेच ऐकत नसेल तर त्यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही पंडित पाटील यांनी दिला आहे.