विधानसभेचा बिगुल वाजला ! आचारसंहिता लागु; निवडणूक आयोगाचे सोशल मिडीयावर विशेष लक्ष

16 Oct 2024 12:41:14
alibag
 
अलिबाग | सर्वांचे लक्ष लागुन राहिलेली विधानसभेची निवडणूक मंगळवारी जाहिर झाली आहे. रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूकीसाठी जिल्ह्यात मंगळवार (१५ ऑक्टोबर) पासून आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात सात मतदारसंघ
रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड असे ७ विधानसभा मतदार संघ आहेत. यामध्ये एकूण २ हजार ७९० मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामासाठी १७ हजार ४९७ कर्मचारी असे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. प्रत्यक्ष कामकाजासाठी १३ हजार ९५५ मनुष्यबळ आवश्यक आहे.
जिल्ह्यात एकूण मतदार किती?
रायगड मतदार संघात एकूण २४ लाख ६८ हजार १२० मतदार आहेत. यामध्ये पुरुष १२ लाख ५० हजार २५६ मतदार तर महिला १२ लाख १७ हजार ७७५ मतदार तर तृतीयपंथी ८९ आहेत. तर दिव्यांग १३ हजार ४८ तर १८ -१९ वयोगटातील ५१ हजार ६१२ मतदार आहेत. तर ८५ पेक्षा अधिक वयोगटातील ३५ हजार ८५९ मतदार आहेत.
नागरिकांच्या सोयीसाठी विविध अ‍ॅप
या निवडणुकीत अ‍ॅपचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही सामान्य नागरिकाला जर निवडणुकीत काही अफरातफर दिसून आली तर या अ‍ॅपवर जाऊन त्याची माहिती द्यायची आहे. फोटो अपलोड करण्याचीही सुविधा आहे. ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.
 
त्याच्या लोकेशनवरून निवडणूक आयोगा सदर परिसराचा माग काढेल आणि १०० मिनिटांच्या आत आयोगाचे पथक त्याठिकाणी दाखल होईल. मतदारसंघातील उमेदवारांची माहिती मिळवायची असेल तर मतदारांना या अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राजकीय जाहिरातींच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरणासाठी सर्व संबंधित राजकीय पक्ष ‘माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडे संपर्क करतील. त्यानुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
निवडणुकीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
स्वतंत्र आणि निशपक्ष निवडणूक घेण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निवडणुक कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २२ समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश करण्यात येणार आहे.

निवडणूक कार्यक्रम
मंगळवार | २२ ऑक्टोबर रोजी राजपत्र अधिसूचना जारी करणे
मंगळवार | २९ ऑक्टोबर नामांकन करण्याची शेवटची तारीख,
बुधवार | ३० ऑक्टोबर नामांकन छाननीची तारीख
सोमवार | ०४ नोव्हेंबर उमेदवारांनी माघार घेण्याची शेवटची तारीख
बुधवार | २० नोव्हेंबर मतदानाची तारीख
शनिवार | २३ नोव्हेंबर मतमोजणी
सोमवार | २५ नोव्हेंबर निवडणूक समाप्त
जिल्ह्यात एकूण मतदार
* जिल्ह्यात २४ लाख ६८ हजार १२० मतदार
* पुरुष १२ लाख ५० हजार २५६ मतदार
* महिला १२ लाख १७ हजार ७७५ मतदार
* तृतीय पंथी ८९ आहेत. दिव्यांग १३ हजार ४८
* १८ -१९ वयोगटातील ५१ हजार ६१२ मतदार
* ८५ वयोगटातील ३५ हजार ८५९ मतदार
मतदारसंघाचे एकूण मतदार
पनवेलमध्ये | पुरुष ३ लाख ४३ हजार ५११ मतदार तर महिला ३ लाख २ हजार ३३३ मतदार तर तृतीय पंथी ७३ असे एकूण ६ लाख ४५ हजार ९१७ आहेत.
कर्जतमध्ये | पुरुष १ लाख ५८ हजार ३९४ मतदार तर महिला १ लाख ५८ हजार २०६ मतदार तर तृतीय पंथी ३ असे एकूण ३ लाख १६ हजार ६०३ आहेत.
उरणमध्ये | पुरुष १ लाख ६८ हजार ७१२ मतदार तर महिला १ लाख ६७ हजार ५०१ मतदार तर तृतीय पंथी १२ असे एकूण ३ लाख ३६ हजार २२५ आहेत.
पेणमध्ये | पुरुष १ लाख ५४ हजार २० मतदार तर महिला १ लाख ५२ हजार ५३२ मतदार असे एकूण ३ लाख ६ हजार ५६१ आहेत.
अलिबागमध्ये | पुरुष १ लाख ४९ हजार ४७४ मतदार तर महिला १ लाख ५४ हजार १२२ मतदार, तर तृतीय पंथी १ असे एकूण ३ लाख ३ हजार ५९७ आहेत.
श्रीवर्धनमध्ये | पुरुष १ लाख २९ हजार ४३६ मतदार तर महिला १ लाख ३४ हजार ४८५ मतदार असे एकूण २ लाख ६३ हजार ९२१ आहेत.
महाडमध्ये पुरुष १ लाख ४६ हजार ७०० मतदार तर महिला १ लाख ४८ हजार ५९६ मतदार असे एकूण २ लाख ९५ हजार २९६ आहेत.
Powered By Sangraha 9.0