नागोठणेजवळ अपघात; चालकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

17 Oct 2024 18:12:45
 nagothane
 
नागोठणे | मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे चिकणी गावाजवळ दोन टेम्पोमध्ये बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी आहे. हे दोघेही मंडणगड तालुक्यातील पिंपळवाडी येथील आहेत. प्रदीप नारायण कासुर्डे (रा.पिंपळगाव ता. मंडणगड) हे बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी छोटा टेम्पो घेऊन मुंबईकडे जात होते.
 
ते नागोठणेजवळील चिकणी गावाजवळ असताना, समोरुन चुकीच्या दिशेने आलेल्या भूषण कृष्णा तेलंगे (रा. तळवळी, ता. रोहा) या टेम्पो चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे छोट्या टेम्पोचा समोरील भाग आतमध्ये चेपला गेला. टेम्पोचे चालक प्रदीप कासुर्डे हे आतमध्येच अडकल्याने त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला व छातीला गंभीर दुखापत झाली.
 
तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍या हसीना खलफे यांनाही जबर दुखापत झाली. या दोघांनाही स्थानिकांनी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले.
 
मात्र प्रदीप कासुर्डे यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर हसीना खलफे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरिक्षक संजय चव्हाण व कर्मचारी तसेच ऐनघर महामार्ग पोलिस गीतांजली जगताप कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले होते.
Powered By Sangraha 9.0