शेकापच्या पाटील कुटुंबातील मतभेद दूर ? पक्षाच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांनी केली मध्यस्थी

पक्ष टिकला पाहिजे; नेत्यांकडे शेकाप कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भावना

By Raigad Times    17-Oct-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठी बातमी हाती आली आहे. शेकापक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या कुटुंबात अलिबागच्या उमेदवारीवरुन सुरु असलेले मतभेद दूर होताना दिसत आहेत. बर्‍याच दिवसांनंतर एका कार्यक्रमाच्या बॅनरवर पेझारीसह सर्व नेत्यांचे फोटो बॅनरवर पहायला मिळाले आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. शेकापमध्ये पहिली वादाची ठिणगी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पडली.
 
पक्षातील पदाधिकार्‍यांच्या नेमणुकांवरुन माजी आमदार पंडित पाटील यांनी भर सभेत, पक्षाच्या नेत्यांना सुनावले. ‘अन्याय खपवून घेणार नाही, काल पक्षात आले नाहीत, त्यांना तुम्ही पक्षाचे नेते करता, मनमानी खपवून घेणार नाही’ असे त्यांनी त्यावेळी बजावले होते. जयंत पाटील आणि पंडित पाटील यांच्यातील खडाजंगी त्यावेळी महाराष्ट्राने पाहिली. खरे तर ते एक निमित्तच होते. असली राजकारण अलिबाग विधानसभा मतदारसंघावरुन सुरु झाले.
 
या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत पंडित पाटील यांचा महेंद्र दळवी यांनी पराभव केला होता. त्यामुळे यावेळी शेकापक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली. तसे करताना, माजी आमदार पंडित पाटील किंवा आस्वाद पाटील या पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही. चित्रलेखा पाटील यांनी सुरुवातीला एका संस्थेच्या नावाखाली कार्यक्रम सुरु केले आणि त्या पक्षाच्या प्रचारापर्यंत येऊन पोहचल्या.
 
हे कार्यक्रम करताना त्यांनी स्वतःची टिम तयार केली. यात नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेतले मात्र, पक्षाच्या नेत्या स्व. मीनाक्षीताई वगळता, पेझारीच्या पाटील कुटुंबातील अन्य महिला नेत्यांना त्यांनी फारसे महत्त्व दिले नाही. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा पाटील, सुमना पाटील यांना त्यांनी पेझारीत झालेल्या कार्यक्रमालादेखील बोलावले नाही. पेझारीतील कार्यक्रम हा पक्षाच्या बॅनरखाली नव्हता, असा बचाव करायला चित्रलेखा पाटील यांना वाव आहे. मात्र या कार्यक्रमाचा हेतू उघड होता.
 
त्या पेझारीकरांची अनुपस्थिती अलिबागमध्ये चर्चेचा विषय ठरली. चित्रा पाटील, सवाई पाटील यांनीही आपली नाराजी बोलून दाखवली होती. शेकापचे प्राबल्य असलेल्या पनवेल, पेण आणि अलिबाग. या तिन्ही मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. विधान परिषदेत बाळाराम पाटील व त्यानंतर खुदद पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचादेखील पराभव झाला होता.
 
एकंदरीत गेल्या पाच वर्षांत पक्षाची घसरण सुरु आहे. त्यातच पेझारी आणि चित्रलेखा पाटील यांच्यातील मतभेद शेकापसाठी चिंतेचा विषय होता. नेत्यांच्या भांडणात कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचे सॅडविच होत होते. पेझारी आणि वेश्वी असे दोन केंद्र निर्माण झाली, त्यामुळे कार्यकर्त्यांना एकदुसर्‍या नेत्यांकडे जाण्याची चोरी झाली होती. ही कोंडी अखेर पक्षातील जुन्या जाणत्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी फोडल्याचे समजते.
 
उमेदवारीवरुन वाद नको, उमेदवारीचा निर्णय सर्वांना विश्वासात घेवूनच केला जाईल अशा निरोपाची देवाण घेवाण दोन्ही नेत्यांकडे झाली. यानंतर पक्षातील वातावरण निवळायला लागले आहे.यानंतर मंगळवारी १५ ऑक्टोबरला कुरुळ येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरुन याची कार्यकर्त्यांना खात्री पटली आहे. या बॅनरवर बर्‍याच दिवसांनी, शेकापच्या पेझारी येथील नेत्या सुमना पाटील पासून सर्व नेत्यांचेही छायाचित्र पहायला मिळाले आहेत. एकंदरीत शेकापमधील पाटील कुटूबांतील मतभेद विधानसभानिवडणूकीच्या तोंडावर दुर होताना दिसत असून शेकाप कार्यकर्त्यासाठी हे आशादायी चित्र असल्याचे बोलले जाते.