जिल्ह्यात धरणे, आंदोलन करण्यास बंदी , रायगड जिल्हाधिकारी किशन जावळेंचे आदेश

विधानसभा निवडणुकीपर्यंत निर्णय लागू

By Raigad Times    17-Oct-2024
Total Views |
alibag
 
अलिबाग | विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केलेत.
 
निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक जाहीर केली आहे. तेव्हापासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदार संघांतील निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालये.
 
तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने, निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे, आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक होते.
 
 
याबाबत संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याची खात्री करून घेतली आहे. जिल्हा दंडाधिकारी रायगड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन निर्बंध आदेश जारी केले आहेत.