कर्जतमध्ये आ.महेंद्र थोरवे, भाजपचे सूर जुळले

28 Oct 2024 17:09:38
karjat
 
कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश कोळी यांनी दिली आहे. तस आ. थोरवे यांनीही सांभाळून घेण्याची विनंती केली आहे. कर्जतमध्ये महेंद्र थोरवे आणि भाजप यांचे सूर जुळत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
 
कर्जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे हे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले तर महायुतीमधील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी राजीनामे देऊन अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यामुळे थोरवे यांनी त्यांचे एकेकाळचे राजकाय वैरी असलेले माजी आमदार सुरेश लाड यांची तब्बल दोनवेळा भेट घेतली होती. भाजपशी वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा झाल्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारात कर्जत विधानसभा मतदारसंघाची भाजप कायम राहील, असे जाहीर आदेश दिले आहेत.
 
या पार्श्वभूमीवर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक गोवा राज्यातील आमदार संकल्प अमोणकर यांनी भाजप पदाधिकारी यांची बैठक माजी आमदार सुरेश लाड यांच्या कार्यलयात बैठक झाली. त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी अन्य महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
संकल्प आमोणकर यांनी, प्रत्येक मतदारसंघ जिंकण्याचे महायुतीचे धोरण आहे. पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ता महायुतीचे उमेदवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला दिसला पाहिजे, असे सूचनावजा आदेश संकल्प आमोणकर यांनी दिले आहेत.
 
काही चुकले असेल तर मला सांभाळून घ्या... महेंद्र थोरवे
माझा कर्जत तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते यांच्याशी चांगले बाँडींग आहे. मात्र मतदारसंघात काम करताना माझे काही चुकले असेल तर मला सांभाळून घ्या, असे आवाहन करतानाच यापुढील काळात भाजप पदाधिकारी यांच्या सूचना यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन देखील थोरवे यांनी दिले.
व्हायरल मेसेजबद्दल जिल्हाध्यक्षांचा खुलासा
भाजप निवडणूक प्रमुख किरण ठाकरे हे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज भरणार असल्याचे मेसेजेस व्हायरल झाले आहेत. या मेसेजशी भाजपचा काही संबंध नाही असा खुलासा जिल्हाध्यक्ष अविनाशकोळी यांनी केला आहे. तसेच किरण ठाकरे यांच्यासोबत जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जातील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0