कोलाड | कोलाड परिसरात उनाड गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला रस्त्यातच ठिय्या मांडणार्या गुरांमुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ज्या मालकांची ही उनाड गुरे आहेत, त्यांनी येत्या दहा दिवसांत ती घेऊन जावी. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांनी दिला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून कोलाड, खांब, सुतारवाडी परिसरात रस्त्यावर उनाड गुरे फ़िरत आहेत. या गुरांचा बंदोबस्तात करावा मागणी नागरिकांकडून केली जात होती. त्याची दखल घेत कोलाड पोलिसांनी गुरुवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कोलाड पोलीस ठाण्यात शांतता कमिटी सदस्यांची तसेच या विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच यांची सभा बोलावली होती.
यावेळी आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, संभे ग्रामपंचायत सरपंच समीर महाबळे, तळवलीचे सरपंच मरवडे, सुरेश वाघमारे ठाकरे सेनेचे चंद्रकांत लोखंडे, प्रफुल्ल बेटकर, वाचकवडे यांच्यासह ज्येष्ठ, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. प्रत्येक सरपंचांनी आपल्या गावात ग्रामसभा घेऊन गावात दवंडी पिटवावी की, गुरे मालकांनी आपली गुरे इकडे तिकडे न फिरवता चरुन झाल्यावर घरी बांधावी. जेणेकरुन ही गुरे रस्त्यात फिरणार नाहीत.
येत्या १० दिवसांत प्रत्येक गावागावात जनजागृती करुन गुरे मालकांना त्यांची गुरे ताब्यात घेण्याचे आवाहन करावे, अशी सूचना सहायक पोलीस निरीक्षक मोहिते यांनी केली. १० दिवसांनंतरही ही गुरे रस्त्यावर दिसली तर त्यांना गोशाळेत पाठविण्यात येईल आणि होणारा खर्च गुरांच्या मालकांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, कोलाड विभागात सुव्यवस्था राखण्यासाठी गावात संशयित किंवा फेरीवाले दिसल्यास त्यांच्याकडे पोलीस ठाण्याचे पत्र मागवावे. ते असेल तरच त्यांना परवानगी द्यावी, असे आवाहन असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी केले.
उनाड गुरे गो-तस्करांसाठी संधी
उनाड गुरांच्या प्रश्नी रोहा तहसीलदारांनाही निवेदन देत, उपाययोजनेची मागणी करण्यात आली आहे. अपघातात जखमी झालेल्या जनावरांवर प्राणीमित्र तात्पुरते उपचार करतात; यावर प्रशासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे. आजुबाजुच्या तालुयात सध्या गोवंश आणि गोमांस तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
उनाड गुरे गोतस्करांसाठी आयती संधी ठरत आहे. यातून गोवंश हत्या झाल्यास धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण होण्याची शयता नाकारता येत नाही. तशी वेळ येऊ नये यासाठी वेळीच लक्ष देऊन कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी रोहा तहसिलदारांकडे केली आहे.