सर्वांधिक निधी आणणारा आमदार म्हणजे भरतशेठ-मंत्री उदय सामंत

By Raigad Times    30-Oct-2024
Total Views |
 mhad
 
महाड | राज्यातील सर्वाधिक निधी आमदार भरत गोगावले यांनी महाड मतदारसंघासाठी आणला आहे. तीन वेळा आमदार होऊनही जमिनीवर असणारे आ. भरतशेठ यावेळी आमदारकीचा चौकार मारणार, असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. माणुसकी व भावना जपणारा आमदार राजकारणात होणार नाही. त्यामुळे त्यांचा आमदारकीचा चौकार असा मारा की, भविष्यात कुणीही त्यांच्याविरोधात फॉर्म भरणार नाही, असे आवाहनही सामंत यांनी केले.
 
महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत ना. सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. सुनिल तटकरे, आ. प्रविण दरेकर, माजी आ. अनिकेत तटकरे, मुश्ताक अंतुले, शाम सावंत, विकास गोगावले, सुषमा गोगावले यांसह महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सुभाष देसाई यांनी आपण उद्योग आणले नाही हुकूमशाही चालवली या आरोपांचा समाचार घेताना सांगितले की, तुम्ही उद्योग मंत्री असताना जे उद्योग केलेत ते झाकण्यासाठी स्वतःच्या मुलाला शिंदे गटात पाठवले.
 
mhad
 
तुम्ही कशी हुकूमशाही केली व लुटलेत हे जनतेसमोर सांगण्याची वेळ आणू नका. तुमची निष्ठा काय हे मुलाला शिंदे गटात सामील करून दिसली. त्यामुळे प्रथम घरात एकत्र या आणि मग संघटनेसाठी काम करा असा सल्ला सामंत यांनी देसाई यांना दिला. भरतशेठ यांच्या आशीर्वादामुळे आपण पालकमंत्री झालो. आपला नेता मोठा व्हावा यासाठी भरतशेठने पदाचा त्याग केला. राज्यातील २८८ आमदारांमध्ये सगळ्यात जास्त निधी भरतशेठने आणला. मुघलांना संताजी, धनाजी दिसतात तसे विरोधकांना एकनाथ शिंदे व भरतशेठ दिसतात. विरोधकांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न केला.
 
आजच्या गर्दीने विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळाले असून पुढचे पालकमंत्री भरतशेठ असतील. फटाके दुकानदारांना दिवाळीनंतर फटाके स्टॉल बंद करू नका, तुमचे सर्व फटाके आम्ही खरेदी करु,असे सांगितले आहे आणि विरोधकांनी नेलेले फटाकेही आपण खरेदी करुन त्यांच्या घरासमोर वाजवू, असहीे सामंत यांनी सांगितले. खा. सुनील तटकरे म्हणाले की, बॅ. ए.आर. अंतुले यांना कोकणाच्या विकासाचे जनक बोलले जाते त्याचप्रमाणे दासगांव गोठे पुलामुळे भरत गोगावले यांचे नांव अजरामर होईल.
 
mhad
 
त्यांच्यामुळे महाडच्या पुराचा धोका कमी झाला. महाडला पूरमुक्त करण्याचे कामही तुमच्या हातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या मंत्रिपदाच्या कोटवरुन विरोधकांनी भरत गोगावले यांची टिंगल केली, तोच मंत्रिपदाचा कोट त्यांना सन्मानाने चढविण्याची जबाबदारी महाडकरांची आहे, असे आवाहन आ. प्रविण दरेकर यांनी केले आहे. आजची हजारोंची उपस्थिती पाहता आ.गोगावले यांना लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार जनतेने केल्याचा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.
 
आ. गोगावले यांनी उपस्थित राहिलेल्या जनतेचे आभार मानत, लोकांना जमवण्यासाठी आम्हाला पैसे मोजावे लागत नाहीत. त्यांच्या अडीअडचणीच्या काळात आपण मदत करीत असतो. १५० पानांच्या विकास कामांचे पुस्तक प्रकाशित केले आहे. यातील एखादे काम खोटे आहे असे सिध्द केले तर माफी मागेन, असे जाहीर आव्हान त्यांनी विरोधकांना केले. विकास गोगावले यांनी भरत गोगावले हे आतापर्यंतच्या चारही निवडणुका धनुष्यबाण चिन्हावर लढले; मात्र विरोधकांना तीन तीन चिन्हे घेऊन लढावे लागत आहे. मग गद्दार कोण? असा सवाल करीत २३ तारखेनंतर सुभाष देसाई यांची कुंडली बाहेर काढणार, असा इशारा दिला. या सभेनंतर महाड शहरातून आ. गोगावले यांची भव्य रॅली काढण्यात आली