उरणची तरुणाई ऑनलाईन लॉटरीच्या विळख्यात , अनधिकृत ऑनलाईन लॉटरी विक्रेत्यांमुळे कित्येकांचे संसार धुळीस

By Raigad Times    04-Oct-2024
Total Views |
 uran
 
उरण | शो युवर स्किलअसे आवाहन करून तरुणांना ऑनलाईन लॉटरीच्या विळख्यात ओढण्याचे काम सध्या नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरात सुरु आहे. ऑनलाईन लॉटरीच्या नावावर सुरु असलेल्या या जुगार अड्ड्यांवरलॉटरी खेळण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी होत असून, पोलीस प्रशासन मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने लॉटरी विक्रेत्यांचे फावले आहे.
 
ऑनलाईन जुगाराच्या नादी लागून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कर्जबाजारीपणामुळे अनेकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत सुरु असलेली दुकाने यापूर्वी बंद करण्यात आली होती. पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अनेकांची कुटुंबं उद्ध्वस्त होण्यापासून वाचली होती.
 
आता मात्र बंद असलेली ही दुकाने पुन्हा सुरु करण्यात आल्याने दुकाने बंद झाल्यामुळे आनंदी झालेल्या कुटुंबांवर पुन्हा एकदा उद्ध्वस्त होण्याचे सावट निर्माण झाले असून, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने दखल घेऊन सुरु झालेली दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, अशी मागणी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात उद्ध्वस्त झालेल्या व्यक्तींचे कुटुंबीय करत आहेत. झटपट श्रीमंत होण्यासाठी किंवा शॉर्टकट पद्धतीने पैसे कमविण्यासाठी काहीजण ऑनलाईन लॉटरीचे तिकीट काढत असतात.
 
पण, अनधिकृत ऑनलाईन लॉटरी विक्रेत्यांमुळे कित्येकांचे संसार धुळीस मिळाले आहेत. दोन आकडी आणि पंधरा मिनिटांत रिझल्ट यामुळे सामान्य माणूस या लॉटरी सेंटरकडे आकर्षित होतो, पण त्यांच्या पदरी निराशाच येते. परिणामी, कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरात साधारणतः २०० अनधिकृत लॉटरीचे सेंटर असून, महिन्याला लाखोंचा व्यवसाय या सेंटरमध्ये होतो.
 
समाजातील मटका व जुगार या व्यसनांना प्रतिबंध घालून त्यातून होणार्‍या जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी १९६९ साली राज्य वित्त विभागाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. यामुळे बेरोजगार तरूणांना व्यवसायाची संधी उपलब्ध झाली. या लॉटरी व्यवसायावर सरकारकडून २८ टक्के जी.एस.टी. आकारण्यात आला. त्यामुळे लॉटरीची व्यवसायाला मंदीची झळ बसली.
 
आणि बरेच व्यवसाय बंद पडले. याचाच फायदा घेऊन अनधिकृत ऑनलाईन लॉटरी विक्रेत्यांनी जागोजागी आपली दुकाने सुरू केली. अकरा रूपयांपासून सुरू होणारे तिकिटांची लाखोंची उलाढाल होते. अगदी सहज उपलब्ध होणारे आणि पंधरा मिनिटांत रिझल्ट यामुळे सामान्य माणूस तेथे सहज आकर्षिला जातो. आणि जिंकण्याऐवजी तो स्वतःकडचे सर्व रूपये गमावून बसतो.
 
मग गमावलेले रूपये परत मिळण्यासाठी कर्ज करून बसतो. आणि कर्ज चुकविण्यासाठी आत्महत्या हा शेवटचा पर्याय त्याच्यासमोर राहतो. महाराष्ट्र राज्यात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली नोंदणी आहे. हे महाराष्ट्र राज्य दुकाने आणि आस्थापना कायद्यांतर्गत महानगरपालिकेद्वारे नियंत्रित केले जाते.
 
हे एक प्रमाणपत्र आहे जे तुम्हाला विशिष्ट ठिकाणी तुमचा व्यवसाय करण्याचे अधिकार प्रदान करते. हा परवाना तुमच्याकडे नसल्यास नगरपालिकेकडून दंड आकारण्यात येतो. हे लॉटरी सेंटर एखाद्या विभागात एक छोट्याशा दुकानात विनापरवाना किंवा बोर्ड न लावता हा व्यवसाय सुरू करतात. यांच्यावर पालिकेतर्फे कोणतीही कार्यवाही केली जात नाही.
पोलीस प्रशासनाचा कानाडोळा
हे लॉटरी सेंटर एकप्रकारचा जुगाराचा अड्डाच आहेत. यामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कित्येकांना आपला जीव गमावला आहे. तरीही पोलीस प्रशासन या व्यवसायाकडे कानाडोळा करत आहे.
 
उरण - नवी मुंबई परिसरात सध्या विन गेम आणि प्ले लॉटरीच्या नावावर ऑनलाईन जुगारद मोठ्या प्रमाणात सुरु असून, लॉटरीचे तिकीट खरेदी करताना आम्ही आमच्या जबाबदारीवर हा खेळ खेळत असल्याचा उल्लेख छापून ही तिकिटे विकली जात आहेत.