खालापूरः ईरशाळवाडी नवीन वसाहतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

By Raigad Times    05-Oct-2024
Total Views |
 khopoli
 
खोपोली | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक खालापूर तालुक्यातील ईरशाळवाडी येथील नवीन वसाहतीमध्ये येऊन पाहणी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, चौक ग्राम पंचायतीच्या सरपंच रितु ठोंबरे आदी अन्य नेते व कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. अचानक आलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे अधिकारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून ते मुंबई कडे जाण्यासाठी निघाले असता त्यांनी आपला दौरा अचानकपणे खालापूर तालुक्यातील ईरशाळवाडी गावाचे पुनर्वसन होत असलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी वळविला, मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे आपला दौरा ईरशाळवाडी भेटीसाठी वळविल्याने अधिकार्‍यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.
 
मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुनर्वसन ईरशाळवाडी येथे उभारण्यात आलेली घरे, दवाखाना, शाळा, अंगणवाडी आदी सर्व कामांची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले की, दिवाळीला ईरशाळवाडी ग्रामस्थ नव्या पुनर्वसन गावातील घरात असतील अशा पध्दतीने पुनर्वसन वसाहतीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.