जेएसडब्ल्यू कंपनीत स्थानिकांना नोकरी द्या , अन्यथा १४ ऑटोबरपासून आमरण उपोषण; ग्रामस्थांचा इशारा

By Raigad Times    09-Oct-2024
Total Views |
 pen
 
पेण | मागील सुमारे दीड वर्षापासून जेएसडब्ल्यू कंपनीकडे काराव ग्रामपंचायतने स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न केले. अनेकवेळा कंपनी प्रशासनाशी यासंदर्भात बैठकाही झाल्या परंतु कंपनीने कायम ग्रामस्थांची फसवणूकच केल्याची माहिती काराव सरपंच मानसी पाटील यांनी गडब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
१४ ऑटोबर रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या गोवा गेट जवळ ग्रामस्थ व ग्रामपंचायतीतर्फे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. सदर पत्रकार परिषदेला सरपंच मानसी पाटील, संध्या म्हात्रे, परशुराम मोकल, मनोहर पाटील, मनोज म्हात्रे, सीता पाटील, दिपक कोठेकर, जगदीश कोठेकर, किर्ती म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, मुक्ता वाघमारे, दिनेश म्हात्रेंसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
 
जेएसडब्ल्यू कंपनीने दि.७ नोव्हेंबर २०२३ रोजी डिप्लोमा डिग्री व आयटीआय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरीता नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या नोकर्‍यांकरिता गडब काराव ग्रामपंचायत हद्दीमध्ये ८५ विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. परंतु कंपनीने भरती करताना स्थानिक तरुणांना नोकरीत सामावून घेतले नाही. त्यामुळे कंपनी विरोधात ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
 
जेएसडब्ल्यू कंपनीने ग्रामपंचायतकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत भराव, उत्खनन आदी कामे केली आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारसुद्धा दाखल केली आहे. कंपनीने नैसर्गिक नाल्यामध्ये पाईप टाकून अतिक्रमण करत भराव केल्याने येथील मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.
 
स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना हक्काची नोकरी, अतिक्रमण हटविणे, खार कारावी येथील सर्वे नंबर ९३ व खारमाचेला येथील सर्वे नंबर ९४ हि गुरचरणाची जमीन ग्रामपंचायतला परत मिळावी.या व इतर मागण्याकरिता १४ ऑटोबर रोजी कंपनीच्या गोवा गेट जवळ काराव ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहेत.