नागोठण्याची जागृत ग्रामदेवता श्री जोगेेशरी माता

By Raigad Times    09-Oct-2024
Total Views |
 
 roha
 
रोहा | रोहा तालुक्यातील नागोठणे गावचे जागृत आराध्य ग्रामदेवता भक्तांच्या हाकेला धावून जाणारी श्री जोगेेशरी माता नागोठणे येथील निसर्गरम्य तीन तलावांच्या मध्यभागी वास्तव करीत आहे. मंदिरात श्री जोगेेशरी मातेची मूर्तीसह श्री भैरवनाथ महाराज व श्री व्याघ्रेेशर महाराज यांच्या देखील मूर्ती आहेत. शारदीय नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने मंदिर व परिसरात मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपूर्वी नागोठणे गावच्या हद्दीतील मौजे मुरावाडी येथील रहिवासी हिरु ताडकर हे आपली गुरे चरण्यासाठी डोंगरपठारावर गेले असता, त्याठिकाणी त्यांना कोणीतरी हाक मारत असल्याचा भास झाला.
 
दुसर्‍या दिवशीही त्याच ठिकाणी पुन्हा तसाच कोणीतरी हाक मारत असल्याचा भास झाला. या ठिकाणी येणारा आवाज हा कुणाचा असेल याचा विचार करीत ते घरी आले. ताडकर हे रात्री झोपले असताना हिरु तारकर यांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितले की, "तू रोज ज्या ठिकाणी गोरे चारायला घेऊन जातोस त्या ठिकाणी मी आहे. मला तुझ्या गावी घेऊन चल. तुझ्या गावी घेऊन जात असताना मी ज्या ठिकाणी तुला जड लागेल त्या ठिकाणी मला उभ्याने टाकून दे. दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे तारकर डोंगरपठारावर गेले असताना देवीने सांगितलेल्या ठिकाणी गेल्यावर तिथे देवीची पाषाणरुपी मूर्ती दिसली.
 
मोठ्या श्रद्धेने त्यांनी ती मूर्ती डोक्यावर घेतली व चालत निघाले. दरम्यान नागोठणे येथील तीन तळ्याच्या मध्यभागी आल्यावर त्यांना मूर्ती जड वाटू लागली. त्यांनी विचार केला की, जर मूर्ती उभ्याने टाकली तर मूर्तींची तोडफोड होईल म्हणून त्यांनी मूर्ती हळूच खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु मूर्तीचा भार ताडकर यांना सहन न झाल्याने मूर्ती खाली ठेवतानाच त्यांना मूर्ती चरणी मोक्षप्राप्ती झाली. त्यामुळे त्याच ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे याठिकाणी सूर्य उगवताना व मावळताना सूर्यकिरणे मातेच्या स्वयंभू स्थानावर पडतात. ग्रामस्थांनी देवीचे छोटे मंदिर बांधून स्थापना केली.
 
त्यामध्ये श्री जोगेेशरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेेशर महाराजांची स्थापना केली. दरवर्षी नित्यनियमाने चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीच्या दुसर्‍या दिवशी देवीचा पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. दरवर्षी साजर्‍या होणार्‍या पालखी उत्सवानिमित्त दरवर्षी नागोठणे खडकआळी येथील ग्रामस्थ मंडळ देवीच्या ध्वजाची उंची काठी सजवून वाजत गाजत नाचत आणत मंदिरासमोर उभी करतात. या पालखी उत्सवाच्या आदल्या दिवशी मंदिरांमध्ये सत्यनारायणाच्या महापूजेचा आयोजन करण्यात येते. जवळजवळ चाळीस ते पन्नास लाख खर्च करून बांधलेल्या मंदिराचे व नवीन मूर्तींचे प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा परंडामठाचे मठाधिपती गुरु रेवांसिद्ध, शिवाचार्य परंडकर महाराज यांच्या हस्ते २००१ रोजी करण्यात आले श्री जोगेेशरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेेशर महाराजांच्या जुन्या मूर्ती ज्या विसर्जित केल्या होत्या त्या थोड्या दिवसांनी समुद्राच्या बाहेर आल्यावर त्या लोकांना दिसू लागल्या. याची कल्पना हरिहरेेशर येथील नागरिकांनी नागोठणे वासियांना दिली.
 
त्यानंतर नागोठणे येथील ग्रामस्थ हरिहरेेशर येथे जाऊन त्या मूर्ती नागोठणे येथे आणून नवीन मंदिराच्या समोर छोटे मंदिर बांधून त्यांची सन्मानपूर्वक स्थापना केली. श्री जोगेेशरी मातेचचा पालखी सोहळा म्हणजे समस्त नागोठणेकर वासयांसाठी एक क्षण उत्सव असतो या उत्सवाची वाट नागोठणेकर ग्रामस्थ एखाद्या चातकासारखी दरवर्षी वाट पाहत असतात. १९९७ रोजी गावातील ग्रामस्थांनी नवीन मंदिर बांधण्याची कल्पना मांडली व ग्रामस्थांची एक जीर्णो द्धार कमिटी स्थापन करण्यात आली. गावातील व परिसरातील भाविकांनी मंदिरासाठी सढळ हस्ते मदत केली.
 
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळील मेढा येथील जोशी पुरोहितांच्या प्रमुख उपस्थितीत नागोठण्यातील ज्येष्ठ समाजसेवक कै. तात्यासाहेब टक्के यांनी सह पत्नी मंदिराच्या पायाभरणी चे पूजन केले व पुणे येथील वास्तू विशारद सुहास कारखानीस यांनी बनवलेल्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे श्री जोगेेशरी माता, भैरवनाथ महाराज व व्याघ्रेेशर महाराज या मंदिरांसह यांचे शेजारी श्री गणेश व श्री मरिआई मंदिराचे सुंदर बांधकाम करण्यात आले आहे. नागोठणे गावचे जागृत आराध्यदैवत श्री जोगेेशरी मातेच्या मूळ स्थानावर म्हणजेच पूर्वेकडील डोंगर (घरळी) येथे ज्याठिकाणी हिरु ताडकर यांना देवीची मूर्ती दिसली होती त्याठिकाणी नागोठणे येथील खडकआळी ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने नित्यनेमाने दरवर्षी पौष शुद्ध दुर्गाष्टमीला शांती होम व श्री सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात येत असते. - अनिल पवार, नागोठणे